पिंपरी चिंचवड :
पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला अनेक अडचणी आहेत. त्यातूनच पोलीस चांगले काम करत आहेत. अपुरी संसाधने असताना त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पुढील काळात पोलीस दलाचे बळकटीकरण केले जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्ट्स सायकल वाटपाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट आयुक्तालयाची इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची असेल. पोलिसांसाठी हक्काचे घर असण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुन्हेगारीतून मिळणाऱ्या पैशातून प्रस्थ वाढविण्याचे काम काहींनी सुरु केलंय. हे मोडून काढण्यासाठी मी स्वतः लक्ष घातलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला पोलीस वाहने, मनुष्यबळ, परेड ग्राउंड, निवासस्थाने, आयुक्तालय इमारत, पोलीस ठाण्यांच्या इमारती चांगल्या नाहीत अशा अनेक अडचणी आहेत. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहेत. आयुक्तालयाला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या जमिनी देण्यासाठी बैठकी घेतल्या आहेत. आता निधी दिला आहेच, यापुढील काळात आवश्यकता भासल्यास आणखी निधी देण्यात येईल.
स्मार्ट वॉच वाटपाचा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांची कार्यक्षमता वाढविणारा आहे. 2020 हे वर्ष कोरोनासाठी लढण्यात गेलं. 2021 हे वर्ष कोरोनमुक्तीचे असेल, अशी प्रार्थना करूयात. स्मार्ट वॉचच्या माध्यमातून पोलिसांचे आरोग्य चांगले राहील. यामुळे पोलीस स्मार्ट होण्यास मदत होईल. उद्यापासून पोलीस स्मार्ट वॉच घालून कर्तव्यवर येतील. हे वॉच पोलिसांच्या आरोग्याबाबत निरीक्षण करेल.
पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला तोड नाही पोलिसांनी कोरोना काळात जोखीम पत्करून पार पाडलेली जबाबदारी आणि कर्त्यव्यनिष्ठेला तोड नाही. पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करतो. कोरोनाशी लढताना काही पोलिसांचा मृत्यू झाला. त्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण करतो. लोकांनी देखील पोलिसांसाठी आपलेपणाचे वातावरण निर्माण केले होते.
दरम्यान, अजित पवार पोलिसांना उद्देशून म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडांचा बंदोबस्त करा, त्यांचा नायनाट करा, परंतु सर्वकाही कायद्याच्या चौकटीत राहून करा. कारवाई करताना संबंधित व्यक्ती कुठल्या पक्षाची, कुठल्या गटाची आहे, हे पाहू नका. जर कुणी गुन्हेगारी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. कोणताही राजकीय दबाव सहन नका करु. माझा सोडून कोणाचा फोन आला तर मला सांगा, त्याच्याकडे मी पाहतो.