महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील समस्या सोडविण्यासाठी दोन्हीं राज्यातील राज्यपाल सोबत बैठक संपन्न

0
slider_4552

कोल्हापूर :

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लब येथे दोन्ही राज्यांची समन्वय बैठक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी महाराष्ट्रातील सीमा भागातील पाच जिल्हे व कर्नाटक राज्यातील चार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमेलगतच्या जिल्ह्यात परस्परात चांगला समन्वय आहे. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून ज्या काही समस्या राज्यस्तरावरुन सोडविल्या जाणे आवश्यक आहे त्याबाबत राज्य शासनाला सुचित करण्यात येईल, असे सांगून ही समन्वय बैठक पुढील काळात नक्कीच लाभदायक ठरेल असेही त्यांनी सुचित केले.
कर्नाटकचे राज्यपाल श्री. गेहलोत यांनी या राज्यस्तरीय समन्वय बैठकीबाबत समाधान व्यक्त करुन या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सर्व संबंधित स्थानिक प्रशासनाने परस्परात अधिक चांगला समन्वय निर्माण करुन त्या भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

आजच्या सामायिक मुद्यांबाबत आयोजित समन्वय बैठकीत सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जे सादरीकरण सादर केले त्या सादरीकरणाचे प्रस्ताव दोन्ही राजभवनकडे पाठवावेत. त्यातील राज्यस्तरीय मुद्यांच्या अनुषंगाने दोन्ही राज्य शासनाला राजभवन कडून सुचित करण्यात येईल, असे दोन्ही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी दोन्ही राज्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणावर मराठी व कन्नड भाषिक सामान्य नागरिक धार्मिक, पर्यटन, रोजगार, आरोग्य व अन्य कारणासाठी ये-जा करत असतात त्यांना दिशादर्शक फलक हे दोन्ही भाषेत( मराठी व कन्नड) करण्याबाबत समन्वय बैठकीत एकमत झाले. यावेळी अनेक सामाईक मुद्द्यावर दोन्ही बाजूने चर्चा होऊन त्यातील काही मुद्याबाबत बैठकीतच एकमताने निर्णय झाले. तर काही मुद्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले. तर राज्यस्तरावरील मुद्यांबाबत दोन्ही राज्यपाल संबंधित राज्य शासनाला सदरील प्रश्न सोडवण्याबाबत सूचित करणार आहेत.

See also  ओबीसी आरक्षणावरुन राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न

रेसीडन्सी क्लब येथील महाराष्ट्र, कर्नाटक आंतरराज्य बैठकीस महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राजभवन येथील सचिव श्वेता सिंघल, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, बेळगावीचे प्रादेशिक आयुक्त के.पी. मोहनराज, कलबुर्गीचे प्रादेशिक आयुक्त कृष्णा वाजपेयी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कलबुर्गीचे जिल्हाधिकारी यशवंत गुरुकर, बीदरचे जिल्हाधिकारी गोविंद रेडी, विजयपुराचे जिल्हाधिकारी डॉ. विजयमहानंदेश दनम्मानवर, बेळगावीचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, लातुरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, बीदरचे पोलीस अधीक्षक डेक्का बाबु, विजयपुराचे पोलीस अधीक्षक डॉ. आनंद कुमार, उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.