औंध :
महाविद्यालयीन तरुणीचा प्रेम प्रकरणातून एका तरुणाने आज बुधवारी दुपारी (ता.९) जकात नाका परिसरात अडवून चाकूने वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या श्वेता विजय रानवडे (२२वर्षे) हिचा मृत्यू झाला आहे.
श्वेताचे व संशयित आरोपी प्रतिक ढमाले (२५ वर्षे) ह्यांचे प्रेम संबंध होते.परंतु त्याचे वर्तन चांगले नसल्याने श्वेताने लग्नास नकार दिल्याने चिडून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. श्वेताच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला.
सदर घटनेची माहिती कळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. या कृत्यानंतर संबंधित संशयित तरुण पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करीत आहेत.