लोणावळा :
लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईला फिरायला नाही तर लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून आरक्षण मागायला चालला आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात व मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळा येथील सभेतून शासनाकडे केली आहे.







लाखोंच्या संख्येने मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघाला आहे. आज वाशी येथे मुक्काम करत उद्यापासून मराठा समाज वाशी ते मुंबई असा पायी प्रवास करत आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी जाणार आहे. दरम्यान आज लोणावळ्यातून वाशी कडे जाताना पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना द्रुतगती मार्गावरून जाऊ न देता जुन्या मार्गाने जाण्याची विनंती केली.
जरांगे पाटील म्हणाले, कोठूनही घेऊन जा, आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही. जरांगे पाटील यांना आमरण उपोषणासाठी आझाद मैदान व शिवाजी मैदान नाकारले आहे. मात्र मनोज रंगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत. शासनाच्या दोन शिष्टमंडळाने आज त्यांची भेट घेत चर्चा केली मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने जरांगे पाटील दुपारी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यावेळी समाजाशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, गाड्यांची तोंड मुंबईच्या दिशेने करून ठेवा, आनं गाड्या एकामागे एक ठेवा, कोणीही पुढे जाऊ नका, मुंबईत शांततेत जायचं आहे, कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
मुंबईकरांची व मराठा समाज आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चा करण्यासाठी समोर यावे व आरक्षणाच्या आमच्या मागण्या मान्य करत तोडगा काढावा अशी मागणी म्हणून जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे पाटील यांच्या वाकसई चाळ येथील सभेला जवळपास अडीच ते तीन लाख मराठा समाज बांधव उपस्थित होते. मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणार आहे मुंबईत कोणतीही गडबड गोंधळ होणार नाही याचा शब्द मी समाजाच्या वतीने देतो असे जरांगे पाटील म्हणाले.
ज्या 54 लाख नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व त्यांचे सगेसोयरे, गणगोत सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. ओबीसी मधूनच समाजाला आरक्षण द्यावे या आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून शासनाने त्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन म्हणून जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाला केले आहे. जरांगे पाटील यांच्या सभेसाठी व सकल मराठा समाज यांच्या मुक्कामासाठी वाकसई चाळ या ठिकाणी 130 एकर जागेमध्ये व्यवस्था करण्यात आली होती तसेच सिलेक्ट या गावाजवळ दीडशे एकर जागा वाहन तळासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.








