पुणे :
१७ ऑगस्ट १६६६ शिवचातुर्य दिनाला 357 वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्त सालाबाद प्रमाणे आग्रा ते राजगड : १२५३ किमी पायी मोहीमेचे आयोजन १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२४ पर्यंत ही गरुड झेप मोहीम पूर्ण करण्यास येणार आहे. मोहिमेचे हे पर्व पाचवे असून १७ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सुरुवात होणार असल्याचे गरुड झेप मोहीम अध्यक्ष राकेश विधाते यांनी सांगितले.







रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आग्रा भेट आणि आग्राहून क्रूर-अत्याचारी औरंगजेबाच्या तब्बल ९९ दिवसांच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुडझेप! त्यामुळे गेले सलग चार वर्ष ही मोहीम राबवली जात आहे.
राजांच्या या पराक्रमाला अभिवादन, या देदीप्यमान इतिहासाचे स्मरण आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहोचवण्यासाठी हातात धगधगती शिवज्योत घेऊन शेकडो मावळे आग्रा ते राजगड हे १२५३ किमी. अंतर १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट, २०२४ या 13 दिवसांत धावत पूर्ण करणार आहेत.
या गरुडझेपः मोहिमेचे हे ५ वे पर्व आहे. धावणारे १५०० मावळे या मोहिमेत सामील होणार आहेत. शिवाय, मुक्कामांच्या ठिकाणी लाठीकाठीसारखे मर्दानी खेळ व प्रसिद्ध शिवव्याख्यात्यांची व्याख्याने हे या मोहिमेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असणार आहे. आग्रा ते राजगड या मार्गावर हरितपट्टा तयार करण्यासाठी वृक्षांच्या 1.5 लाख बिया धावण्याच्या वाटेवर टाकत मावळे येणार आहेत. बीपी_डायबेटिस_मुक्त_भारत हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे गरुड झेप मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष मारुती गोळे यांनी सांगितले.








