बालेवाडी :
दसरा चौकाजवळ असणाऱ्या मद्य विक्री दुकानाचा आजूबाजूच्या लोकांना, जेष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना कायम त्रास होत असतो. हा भाग रहिवासी आहे. अनेक रहिवासी सोसायटी येथे आहेत. जवळच सी एम इंटरनॅशनल स्कूल, एसकेपी शैक्षणिक परिसर, रविंद्रनाथ टागोर , भारती विद्यापीठ व मनपा शाळा आहेत. सात ते आठ हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.







येथून पालकांना आपल्या पाल्यांना घेऊन ये जा करावी लागते. मद्यपी रस्त्यावर मद्य प्राशन करतात. समोरच उघड्यावर लघुशंका करतात. बाटल्यांचा कचरा येथे पडलेला असतो. वाहतूकीला पण अडथळा होतो. पोलिस कारवाई करतात. परंतु या प्रकाराला पुर्ण आळा बसने गरजेचे आहे. या हेतूने बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि सी एम इंटरनॅशनल स्कूल तर्फे अधीक्षक, उत्पादन शुल्क विभागाला एक पत्र आधीच दिले आहे. पण त्यावर अद्याप काहीच कारवाई न झाल्याने, आता जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी यांना पण निवेदन देऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. फेडरेशन तर्फे रमेश रोकडे, मोरेश्वर बालवडकर, वैभव आढाव, अशिष कोटमकर, ॲड. रुपाली रायकर आणि सुनिल गाळणकर यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.








