प्रभाग ९ मध्ये भाजपला बळकटी; माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
slider_4552

पुणे प्रतिनिधी :

प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणांना आता नवा वेग मिळाला असून, पाषाण परिसरातील माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे प्रभागातील भाजपची ताकद वाढण्याची शक्यता असून, स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मागील महानगरपालिका निवडणुकीच्या काळात प्रभाग क्रमांक ९ मध्ये अत्यंत अटीतटीची आणि हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती. अनेक दिग्गज नेत्यांनी या प्रभागात आपले राजकीय बळ पणाला लावले होते. निवडणुकीनंतर काही महिन्यांतच झालेला प्रमोद निम्हण यांचा भाजप प्रवेश हा आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, पाषाण परिसरातील सध्या निवडून आलेल्या नगरसेवकाच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत भाजपच्या अंतर्गत काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवरच प्रमोद निम्हण यांचा भाजप प्रवेश झाल्याची शक्यता परिसरातील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे निम्हण यांच्या प्रवेशाकडे पक्षबदलापेक्षा प्रभागातील बदलत्या राजकीय समीकरणांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

प्रमोद निम्हण यांच्या प्रवेशामुळे पाषाणसह प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपला स्थानिक पातळीवर आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळातील विकासकामे, संघटनात्मक बांधणी आणि भविष्यातील राजकीय रणनीतीवर या प्रवेशाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रभाग ९ मधील आगामी राजकीय घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रवेशाप्रसंगी उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धीरज घाटे, संदीप खर्डेकर, गणेश कळमकर, सचिन पाषाणकर आदी उपस्थित होते.

See also  दगडूशेठ’ ट्रस्टच्या पुढाकाराने दोन चिमुकल्यांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी