पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी; मोर्चे, शस्त्रे आणि भडकावू रिल्सवर पोलिसांचे कडक निर्बंध

0
slider_4552

पुणे:

आगामी सण, उत्सव, राजकीय-सामाजिक कार्यक्रम आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिसांनी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत शहरात प्रतिबंधात्मक आदेश (जमावबंदी) लागू केले आहेत.

पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी ‘महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१’ च्या कलम ३७ (१), ३७ (२) आणि ३७ (३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत. हे निर्बंध १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:०१ वाजेपासून ते ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.

शहर आणि परिसरात संभाव्य तणाव, निदर्शने व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने सार्वजनिक सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले आहे.

प्रमुख निर्बंध आणि नियम:

पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी: पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा मेळावा, रॅली अथवा मिरवणूक आयोजित करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असेल. विनापरवानगी कार्यक्रम घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

शस्त्रे व धोकादायक वस्तू बाळगण्यावर बंदी: सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, दगड, ज्वलनशील वा स्फोटक पदार्थ आणि दुखापत पोहोचवू शकणाऱ्या कोणत्याही वस्तू बाळगण्यास सक्त मनाई आहे.

पुतळे जाळणे किंवा प्रदर्शन: कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होईल अशा प्रकारे कोणत्याही व्यक्ती, राजकीय नेते किंवा संस्थांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन करणे अथवा ते जाळण्यावर बंदी असेल.

आक्षेपार्ह घोषणा व गाणी: सार्वजनिक ठिकाणी भडकावू भाषणे देणे, वादग्रस्त घोषणाबाजी करणे, चिथावणीखोर गाणी वाजवणे अथवा सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृतींवर कठोर कारवाई होईल.

सोशल मीडिया व रिल्सवर विशेष लक्ष: गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ, रिल्स, धमक्या देणे, दहशत निर्माण करणे किंवा सामाजिक शांतता भंग करणारा कोणताही डिजिटल मजकूर शेअर करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असेल.

See also  महिलांचे जीवनमान बदलण्या साठी आर्थिक सक्षमीकरणावर चर्चासत्र…