पुणे महापालिकेच्या पथ विभागाचा भोंगळ कारभार: रस्त्यावरील खड्ड्याने बालकाचा बळी घेतल्याने पालिकेवर चौफेर टीका

0
slider_4552

पुणे:

रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या (PMC) पथ विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिक व लोकप्रतिनिधींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या पथ विभागाकडे स्वतःचा हॉटमिक्स प्लांट, अद्ययावत यंत्रसामग्री, वाहने आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही गेल्या तीन महिन्यांत शहरातील खड्डे का बुजवले गेले नाहीत, असा थेट सवाल माजी नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर महापालिका आयुक्तांनी तात्काळ खुलासा करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. पथ विभागाच्या कारभारावर बोट ठेवत त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

* उत्पादन व पुरवठ्याचा हिशोब द्या: पथ विभागाच्या हॉटमिक्स प्लांटमध्ये गेल्या तीन महिन्यांत नेमके किती डांबराचे उत्पादन झाले आणि ते कोणत्या क्षेत्रीय कार्यालयांना किती प्रमाणात पुरवण्यात आले, याची आकडेवारी जाहीर करावी.

* यंत्रसामग्रीच्या वापराची चौकशी: पालिकेकडे उपलब्ध असलेले पेव्हर, रोलर, व्हायब्रेटर रोलर यांसारख्या साधनांचा गेल्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष किती वापर झाला, याचा तपशील समोर आणावा.

* कामगारांच्या कामाचा आढावा: पथ विभागातील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांनी खड्डे बुजवण्यासाठी प्रत्यक्षात काय काम केले, याची सखोल माहिती घेण्यात यावी.

फक्त निविदा काढण्यावर भर नको’

पालिकेची स्वतःची सर्व साधनसामग्री आणि यंत्रणा सज्ज असताना खड्डे बुजवण्यासाठी केवळ नवीन निविदा (Tenders) काढण्यावर भर देणे अत्यंत चुकीचे आहे. आयुक्तांनी स्वतः हॉटमिक्स प्लांटला तातडीने भेट देऊन तेथील आवक-जावक रजिस्टर, मेमो आणि प्रत्यक्ष कामकाजाची कसून तपासणी करावी. पथ विभागाने आपली जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर ढकलून स्वतः मोकळे होण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

म्हाळुंगे रस्त्यावरील साईडपट्टीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी (दि. १९) सकाळपासून हाती घेण्यात आले. या कामाची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या पथविभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारत प्रशासनाच्या कारभाराचा जाब विचारला. नागरिकांच्या प्रश्नांचा भडिमार वाढल्यानंतर अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

See also  ISRO साठी निवड झालेल्या निकिता सुपेकर हिचा बाणेर नागरी पतसंस्थेचे वतीने सन्मान.