पुणे :
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनचा (हायस्पीड रेल कॉरिडोर) समावेश विकास आराखड्यात करावा, अशी सूचना भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) केली आहे.
भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने देशभरात आठ ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे हैदराबाद असे दोन प्रकल्प आहेत. त्यापैकी हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही ट्रेन ताशी २५० ते ३२० या वेगाने धावणार आहे. मुंबई ते हैदराबाद सुमारे ७११ किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर ही ट्रेन साडेतीन तासांत कापणार आहे. या ट्रेनच्या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे असणार आहेत. या रेल्वेचा मार्ग मोठ्या प्रमाणावर पीएमआरडीएच्या हद्दीतून म्हणजेच लोणावळ्यापासून पुणे, मांजरी, सासवड या भागातून जातो. तसेच ‘पीएमआरडी’ने विकास आराखड्यात ग्रोथ सेंटर प्रस्तावित केले आहेत. त्यातून हा मार्ग जातो. मात्र, विकास आराखड्यात हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला नाही. तो समाविष्ट करावा, यासाठी हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने यापूर्वी ‘पीएमआरडीए’ला पत्रदेखील दिले होते.
दरम्यान, या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन प्रस्तावित विकास आराखड्यात हा रेल्वे मार्ग दर्शविण्याबाबतच चर्चा केली. त्यास पीएमआरडीएनेदेखील हिरवा कंदील दाखविला आहे.
सध्या मुंबईवरून रेल्वेने पुण्याला येण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. या रेल्वेमुळे हे अंतर ४५ मिनिटांवर येणार आहे, तर पुण्यावरून हैदराबादला शताब्दी रेल्वेने जाण्यासाठी सुमारे ८ ते ९ तास लागतात. अन्य रेल्वेला हेच अंतर कापण्यासाठी दहा ते बारा तासांहून अधिक कालावधी लागतो. तो वेळ साडेतीन तासांवर येणार आहे.
प्रकल्पाचा अंदाजित खर्च – १४ हजार कोटी
प्रतिकिलोमीटर वेगाने धावणार – २२० ते ३५०
प्रवासी क्षमता – ७५०
मुंबई-हैदराबाद मार्गाची लांबी – ७११ किमी
प्रकल्पाच्या ठळक बाबी…
बुलेट ट्रेनचे रूळ हे स्टॅंडर्ड गेज असणार (दोन रुळांतील अंतर ४ फूट ८.५ इंच)
भूकंप झाल्यास आपोआप ब्रेकिंगसाठी भूकंप शोध यंत्रणा (यूपीएडीएएस)
काही मार्ग इलेव्हेटेड, तर काही भार्ग भुयारी असणार
विकास आराखड्यात मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड मार्ग दर्शविण्याची विनंती केली आहे. मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे, परंतु अद्याप प्रकल्प अहवाल तयार झालेले नाही. तो झाल्यानंतर यावर विचार करता येईल. पुन्हा एकत्रित एक बैठक घेण्याचे ठरले आहे.
– सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए