‘अश्वगंधा’ वनस्पतीची कोव्हिड लसीकरणानंतरची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी संशोधनात सामान्य नागरिकांना सहभागाची संधी

0
slider_4552

पुणे :

‘अश्वगंधा’ या औषधी वनस्पतीची कोव्हिड लसीकरणानंतरची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी सुरू असणाऱ्या आयुष मंत्रालयाच्या संशोधनात सामान्य नागरिकांना सहभागी होण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.

हा प्रकल्प आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांचा एक भाग आहे. पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली, हसन, बेळगाव, जयपूर या ठिकाणी हा प्रकल्प सुरू आहे. कोव्हिड १९ प्रतिबंधासाठी लस घेतल्यानंतर अश्वगंधा वापरल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास किती मदत होऊ शकेल, आणि त्याचे काय सकारात्मक परिणाम होतील हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून हे संशोधन सुरु आहे. या प्रकल्पाची संकल्पना आयुष मंत्रालयातील राष्ट्रीय संशोधक प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांची आहे. डॉ. अरविंद चोप्रा या अभ्यासाचे प्रमुख आहेत तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर, आरोग्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गिरीश टिल्लू तसेच संशोधक विद्यार्थी या प्रकल्पासाठी काम करीत आहेत.

या संशोधन प्रकल्पाचे पुण्यातील केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असून या केंद्रात लसीकरण झालेल्या १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना या अभ्यासात सहभागी करून घेण्यात येत आहे. या प्रकल्पात सहभागी नागरिकांना लस घेतल्यानंतर ‘अश्वगंधा’ च्या गोळ्या देण्यात येतील. त्या गोळ्या घेतल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती ही केवळ लस घेणाऱ्यांच्या तुलनेत किती वाढली याचा अभ्यास केला जाईल. अश्वगंधा ही औषधी अनेक आजारांवर उपयुक्त आहे असे याआधीच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पात सहभागी नागरिकांची संपूर्ण काळजी घेण्यात येईल. तसेच त्यांच्यावर आर्थिक भार पडणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येईल , असे डॉ. गिरीश टिल्लू यांनी सांगितले.

सहभागी होण्यासाठी काय करावे?

१८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींनी लशीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर ७ दिवसांच्या आत विद्यापीठातील आरोग्य केंद्रास भेट द्यायची आहे. तिथे त्यांना या संशोधनबाबतची संपूर्ण माहिती समजावून सांगितली जाईल. सहभागी होण्यास अनुमती दिलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल आणि त्यांना अश्वगंधा च्या गोळ्या दिल्या जातील. त्या गोळ्यांचे सेवन नियमितपणे करणे अपेक्षित आहे. ठराविक कालानंतर पुन्हा तपासणी केली जाईल. यासाठी सर्व खर्च केंद्राकडून दिला जाईल असेही डॉ. गिरीश टिल्लू यांनी सांगितले. याबाबतची अधिक माहिती ९७६६५५५३१४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर मिळेल.

See also  दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीची मान्यता