मुंबई :
विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघात खेळला गेला. या सामन्यात सौराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत 50 षटकात 9 गडी गमावत 248 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्र संघाने चांगली सुरुवात केली आणि महाराष्ट्रावर 5 गडी राखून मात केली आणि विजय हजारे ट्रॉफीवर आपले नाव कोरले. महाराष्ट्रासाठी ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 108 धावा केल्या. तर सौराष्ट्र संघासाठी शेल्डन जॅकसन याने सर्वाधिक 133 धावा केल्या.
महाराष्ट्र संघ पाहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या संघात शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयममध्ये हा सामना खेळवला गेला. सौराष्ट्र संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पवन शाह (Pavan Shah) अवघ्या 4 धावा करत धावबाद झाला. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने झंझावती शतक झळकावले. मात्र, नंतर कोणत्याही फलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही आणि महाराष्ट्र संघ निर्धारीत 50 षटकात 9 गडी गमावत 248 धावा करु शकला.
महाराष्ट्राने दिलेेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सौराष्ट्र संघाची सुरुवात धमाकेदार झाली. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. सलामीवीर हार्विक देसाई अर्धशतक करुन बाद झाला तर शेल्डन जॅकसन याने झंझीवती शतक झळकावले. त्याच्या या विस्फोटक शतकामुळे विजयाचे पारडे सौराष्ट्राच्या बाजुने झुकले आणि संघासाठी विजयश्री खेचून आणली. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि सौराष्ट्राने दुसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफीचे जेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.