अंगणवाडी सेविकांच्या विम्यापोटीचा हप्ता केंद्र शासन भरणार – स्मृती इराणी

0
slider_4552

पुणे :

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, राज्यातील 3 हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी 12800 रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली, यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्र, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह देशभरातील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.

मंत्री इराणी म्हणाल्या, शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी 1 हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 38 हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. महेंद्र मुंजापारा म्हणाले की, महिलांच्या शाश्वत विकासासाठी पूरक पोषण आहार देणे, शिक्षण विषयक धोरणे प्रभावीपणे राबविणे, लैंगिक समानतेसाठी काम करणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून एक सशक्त आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी ही योजना सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन त्यांनी केले.

See also  महाबळेश्वर हे पर्यटनासाठी पायाभूत सुविधांचे माहेरघर व्हावे : डॉ. नीलम गोऱ्हे