पुणे :
देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत 14 हजार 753 इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी 14 हजार 368 तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँड पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त 18 तर गुजरातमध्ये 7124 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत,महाराष्ट्रातील तक्रारींमध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 2 हजार 818, मुंबई उपनगरातून 2 हजार 331 आणि ठाण्यातून 2 हजार 183 तक्रारी आलेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातून सर्वांत कमी म्हणजे 34 तक्रारी आलेल्या आहेत.
सर्वाधिक तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्यांमध्ये 4 हजार 556 तक्रारींचा समावेश आहे. मतदार ओळखपत्रावरील दुरुस्त्या करण्यास विलंब झाल्याबद्दल 1 हजार 848 तक्रारी आल्या आहेत. ई- मतदार ओळखपत्राविषयी 1047 तक्रारी आहेत, तर नवे ओळखपत्र मिळवण्याचा अर्ज नाकारल्याबद्दल 521 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मतदार यादीत नाव न सापडल्याबद्दल 500 तक्रारी आलेल्या आहेत.
तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र, मतदार यादी, मतदान चिठ्ठी (स्लिप), निवडणूक आयोगाची विविध अॅप्स, राजकीय पक्ष, मतदान दिन आणि इतर या विषयांवरील तक्रारींचा समावेश आहे. मतदारांच्या तक्रारींचे निवारण करताना त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जातात.
मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांना मतदार नोंदणीपासून ओळखपत्र मिळेपर्यंतचा कालावधी साधारण 45 दिवसांचा असतो. मात्र ई-ओळखपत्र दहा-बारा दिवसांत मिळू शकते, त्यासाठी त्यांनी मतदार यादीत मोबाइल क्रमांक नोंदवावा, असे सांगितले जाते. कोणाला मतदार यादीत नाव सापडत नसल्यास त्यांना नाव शोधण्याची प्रक्रिया सांगितली जाते. तसेच कोणाचे नाव वगळले गेले असल्यास त्याचे कारण आणि प्रक्रिया सांगितली जाते. प्रश्नकर्त्यांच्या समस्याचे निराकरण न झाल्यास त्याला पुन्हा प्रश्न विचारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.