पुणे :
पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता होर्डिंग्स किंवा जाहिरात फलक उभारण्यात येत आहेत. यामुळे शहराचे विदृपीकरण होत असून होर्डिंग कोसळून जीवित किंवा वित्तहानी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ज्या जाहिरात फलक धारकांचे अनधिकृत फलक शहरातील कोणत्याही भागात असतील त्यांनी रविवार (दि. 19 मे) या कालावधीपर्यंत त्यांचे फलक हटवावेत. विहीत कालावधीत अनधिकृत फलक हटविण्यात आले नाहीत. तर सोमवार दि. 20 मे रोजी महापालिकेच्या वतीने संबंधित फलक धारक तसेच जागा मालकावर कायदेशीर कारवाईसहित फलक निष्कासित करण्यात येईल,” असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील होर्डिंग्सबाबत महापालिका अधिकारी, जाहिरात फलकधारक यांच्यासमवेत झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे तसेच संबंधित अधिकारी आणि विविध जाहिरात फलक एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पावसाच्या सुरूवातीस येणाऱ्या वादळ, वाऱ्यामुळे कुजलेली, गंजलेली, कमकुवत अशा प्रकारच्या जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. या घटना टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे.शहरातील फलक धारकांची संख्या प्रचंड प्रमाणात दिवसेंदिवस वाढत असून सध्या बरेच तरूण-तरुणी या व्यवसायामध्ये उतरत आहेत. हा व्यवसाय करत असताना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. फलक किंवा होर्डिंग उभे करत असताना हे सर्व नियम फलक धारकाला माहिती असणे गरजेचे आहे.
फलक धारकाने या नियमांचे पालन केले पाहिजे जेणेकरून होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडणार नाहीत व कोणतीही हानी होणार नाही, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
शहरातील सर्व जाहिरात फलकधारकांनी आपला परवाना दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. दरवर्षी ३१ मार्चपर्यंत विहीत वेळेत फलकधारकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नसेल तर त्यांचा परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नाही. तसेच प्रत्येक फलकधारकाने संरचनात्मक लेखापरिक्षण प्रमाणपत्र (स्ट्रक्चरल ऑडिट सर्टिफिकेट) सादर करणे बंधनकारक आहे. जे फलक धारक प्रमाणपत्र सादर करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द केला जाईल. तसेच फलक उभारण्यात आलेल्या जागेवर संरचना अभियंत्याने पाहणी करूनच संरचनात्मक लेखापरिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे तसेच जाहिरात फलकाची संरचना गंजू नये किंवा कमकूवत होऊ नये यासाठी संरचना पेंटींग करणे बंधनकारक असणार आहे, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या.
तसेच जाहिरात फलक किंवा होर्डिंग लावताना फलकाच्या शेवटी नागरिकांसाठी सूचना लिहिणे गरजेचे आहे. या सूचनांचा नमुना महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने फलक धारकांना देण्यात येईल. होर्डिंगच्या खाली टपरी, दुकान किंवा अतिक्रमण केले गेले तर त्याबाबत फलकधारक किंवा जागा मालकांनी महापालिकेस कळविणे आवश्यक आहे. महापालिका संबंधित दुकान, टपरी किंवा अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करेल. सोमवार दि. 20 मे पासून महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणांची पाहणी करून अनधिकृत फलक हटवून निष्कासणाची कारवाई करण्यात येणार
आहे. तसेच संबंधित फलक धारक आणि जागामालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
*शहरातील जाहिरात फलकांचे 60 टक्के सर्वेक्षण पूर्ण*
महापालिकेच्या वतीने शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण 60 टक्के पुर्ण झाले असून आतापर्यंत १२ अनधिकृत फलक आढळले आहेत. या फलक धारकांना फलक हटविण्याबाबतसूचना देण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत फलक हटविण्यात आले नाहीत तर संबंधित फलक धारकावर तसेच जागा मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच 40 फुटउंचीपेक्षा जास्त उंचीचे जाहिरात फलक आढळल्यास आणि परवानगीपेक्षा जादा मोजमापाचे फलक शहरात उभारले असल्यास संबंधित फलक धारकावरही कायदेशीर कारवाई केलीजाणार असल्याची माहिती सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.
*अनधिकृत फलकांची तक्रार नोंदविण्यासाठी स्मार्ट सारथीवर नवीन सुविधा लवकरच*
पोस्ट अ वेस्टच्या धरतीवर आता नागरिकांना अनधिकृत फलकांची माहिती महापालिकेस कळविता येणार असून स्मार्ट सारथी ऍप्लिकेशनवर महापालिकेच्या वतीने नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनधिकृत होर्डिंग्सवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.