मुसळधार पावसाने पाषाण तलाव तुडुंब; जलपर्णीची समस्या मात्र कायम

0
slider_4552

पाषाण :

सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पाषाण तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला असून, तलावाच्या परिसरातील निसर्गसौंदर्यात भर पडली आहे. मात्र, तलावातील जलपर्णी हटविण्याचे काम अद्याप प्रभावीपणे पूर्ण झाले नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तलावातून पुढे वाहणारी राम नदीही दुथडी भरून वाहत आहे. मात्र, नदीपात्रात ठेकेदाराने काढून ठेवलेली जलपर्णी पाण्याच्या प्रवाहात अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे मोठ्या प्रमाणातील जलपर्णी प्रवाहाबरोबर पुढे वाहून गेली असून, ती विविध ठिकाणी साचल्याने पाण्याचा प्रवाह विस्कळीत होत आहे. सोमेश्वरवाडी येथील कुंडातही मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचलेली आढळून आली.

मुसळधार पावसामुळे नदीकाठावर साठवून ठेवलेली जलपर्णी पुढे वाहून गेल्याने जलपर्णी हटविण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारालाच याचा फायदा झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सध्या तलावातील जलपर्णी मोकळी करून ती थेट पाण्याच्या प्रवाहात सोडली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जलपर्णी हटविण्यासाठी खर्च होणाऱ्या लाखो रुपयांच्या निविदांच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत स्थानिक रहिवासी समीर उत्तरकर म्हणाले, “जलपर्णी हटविण्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची शंका आहे. दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर पाषाण तलाव ओव्हरफ्लो झाला, मात्र तलावातील जलपर्णी अद्याप कायम आहे. पावसाच्या पाण्याबरोबर जलपर्णी वाहून गेल्यानंतरही जलपर्णी हटविण्याच्या कामासाठी दिलेले लाखो रुपयांचे टेंडर वाया जाणार का? यापुढे जलपर्णीची समस्या निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी नियोजन करावे.”

 

See also  कै. मारुती महादू सुतार विद्यालय सुतारवाडी, पाषाण येथे मराठी भाषा पंधरवाडा निमित्त व्याख्यान संपन्न