महाळुंगे :
येथील अमरधाम स्मशानभूमी रस्त्यालगत आणि महादेव मंदिरासमोर असलेल्या ओढ्याची एका बाजूची संरक्षक भिंत पावसामुळे वाहून गेल्याने येथे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येमुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.






स्मशानभूमीकडे जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू झाल्यामुळे येथील प्रसिद्ध महादेव मंदिरामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र, रस्ता खचल्याने आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याच ओढ्यात मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा आणि घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला असून साथरोग पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सण-वत्सराच्या आणि श्रावणाच्या काळात भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, प्रशासनाने या गंभीर बाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दोन मागण्या केल्या आहेत:
* ओढ्याची तातडीने पूर्ण स्वच्छता करून साचलेला कचरा आणि दुर्गंधी दूर करावी.
* खचलेली संरक्षक भिंत आणि रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून रस्ता सुरक्षित करावी.
मोठा अनर्थ घडण्यापूर्वी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी आर्त हाक महाळुंगेतील ग्रामस्थांकडून दिली जात आहे.
प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे : या ठिकाणी असलेल्या ओढ्यावर अमृत योजनेअंतर्गत काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसात या ओढ्यावरील अमृत योजनेचे काम होऊन ही समस्या सोडवण्यात येईल. तोपर्यंत पुढील दोन दिवसात येथील सर्व कचरा उचलून सदर ठिकाणी कापडी जाळी मारण्यात येणार आहे.








