बावधन:
स्थानिक प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या बावधन येथील नागरिकांनी अखेर स्वतःच पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले आहे. ‘बावधन सिटीझन फोरम’च्या सदस्यांनी एकत्र येत स्वखर्चातून आणि लोकसहभागातून ही दुरुस्ती केली.






मिळालेल्या माहितीनुसार, बावधन परिसरातील सन-विंड्स आणि बालतुका कॉर्नरजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, तसेच या मार्गावर सातत्याने लहान-मोठे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी महापालिका व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेकदा लेखी तक्रारी व पत्रव्यवहार केला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर नागरिकांचा धीर सुटला.
प्रशासनाच्या दिरंगाईची वाट न पाहता बावधन सिटीझन फोरमने पुढाकार घेतला आणि नागरिकांच्या मदतीने खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला. नागरिकांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरात कौतुक होत असले, तरी प्रशासनाच्या या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “नागरिकांनी कर भरूनही स्वतःच्या खर्चाने रस्ते दुरुस्त करावे लागत असतील, तर प्रशासनाची भूमिका काय?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता महापालिकेने शहरातील सर्वच धोकादायक खड्ड्यांची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी बावधनकरांकडून केली जात आहे.








