FDA चा सिप्ला फार्मावर मोठा दणका: पुण्यातील वडकी येथील गोदामाचा औषध विक्री परवाना रद्द; ११ लाखांचा साठा जप्त

0
slider_4552

पुणे :

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पुण्यातील वडकी येथील ‘सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्स लिमिटेड’ या कंपनीच्या ‘कॅरी अँड फॉरवर्डिंग’ (C&F) गोदामावर धडक कारवाई केली आहे. नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने या गोदामाचा औषध विक्री परवाना २७ ऑगस्ट २०२६ पासून तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.

कारवाईचे मुख्य कारण आणि घडामोडी:
* नियमबाह्य जाहिरात व औषध जप्ती: जून २०२६ मध्ये एफडीएने केलेल्या तपासणीत ‘रेक्टिन प्लस टॅबलेट’ (शेड्युल एच श्रेणीतील औषध) च्या वेष्टनावर ‘अनालजेसिक व ॲंटीपायरेटीक’ असा अयोग्य उल्लेख करून नियमबाह्य जाहिरातबाजी केल्याचे आढळले. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी मिळून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकत होता. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ चे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने ११.१९ लाख रुपयांचा औषध साठा जप्त केला होता.
* आदेशाची अवहेलना: हे औषध ‘मिसब्रँडेड’ ठरल्यामुळे ते बाजारातून त्वरित मागे घेण्याचे (Recall) निर्देश सिप्ला फार्म्याला देण्यात आले होते; मात्र कंपनीने या निर्देशांचे योग्य पालन केले नाही.

तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी:
* साठ्यात तफावत: संगणकातील नोंद आणि प्रत्यक्ष गोदामातील औषध साठ्यात मोठी विसंगती आढळली.
* अयोग्य साठवणूक: औषधे थेट जमिनीवर ठेवण्यात आली होती तसेच साठवणुकीसाठी पुरेशा रॅकची सोय नव्हती.
* अपूर्ण नोंदी: मुदतबाह्य (Expired) औषधांच्या व्यवस्थापनाचे आणि नोंदींचे काम अपुरे होते.
* कागदपत्रांमधील फरक: खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांमध्ये तफावत दिसून आली.

या गंभीर त्रुटींनंतर एफडीएने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, कंपनीने दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक आढळल्याने प्रशासनाने परवाना रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतला. औषधांचा दर्जा आणि नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी एफडीआयकडून अशी कठोर पावले उचलली जात आहेत.

See also  असेल हिंमत तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे