बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी शून्य करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ ‘ड’मधील विकासकामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने बालेवाडी रेसिडेन्सी सहकारी गृहरचना वेलफेअर फेडरेशनच्या सदस्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.






या पार्श्वभूमीवर फेडरेशनच्या सदस्यांनी अमोल बालवडकर यांची बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. बालेवाडी परिसरातील विकासकामांसाठी आवश्यक असलेला निधी कमी अथवा शून्य केल्याने परिसराच्या विकासाला खीळ बसू शकते, अशी चिंता यावेळी सदस्यांनी व्यक्त केली.
भेटीदरम्यान बालेवाडी परिसरातील रस्ते, पदपथ, क्रीडांगणे, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमणे तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक विकासकामे अद्याप प्रलंबित असून नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचेही सदस्यांनी सांगितले.
विकासासाठी मंजूर असलेला निधी शून्य करण्याच्या निर्णयावर नागरिकांनी संताप व्यक्त करत हा निर्णय बालेवाडीकरांवर अन्याय करणारा असल्याची भावना व्यक्त केली. परिसराच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना फेडरेशनचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बालेवाडीतील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले.








