पाषाण-सुतारवाडी रस्त्यासाठी ९ कोटींचा निधी मंजूर; रोहिणी चिमटे यांच्या पाठपुराव्याला यश…

0
slider_4552

पाषाण :

पाषाण-सुतारवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासह सर्वांगीण विकासकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नुकत्याच झालेल्या जनरल बॉडी बैठकीत या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ९ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आल्याचे आयुक्तांनी जाहीर केले. औंध-बाणेर प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे.

पाषाण-सुतारवाडी रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाली होती. पावसाळ्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अरुंद रस्ता आणि वाढत्या वाहतुकीमुळे सुतारवाडी परिसरात वारंवार वाहतूक कोंडीही होत होती. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून त्याचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.

हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रोहिणी चिमटे यांनी वेळोवेळी जनरल बॉडी बैठकीत आवाज उठविला. खराब रस्त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाढती वाहतूक आणि कोंडीची समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली होती.

निवडणूक झाल्यानंतर लगेचच चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिवटे यांच्यासमवेत संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. या पाहणीदरम्यान मंजूर आराखड्यानुसार रस्त्याची रुंदी २४ मीटर असली, तरी प्रत्यक्षात तेवढ्या रुंदीचा रस्ता उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आवश्यक रुंदीकरण करून संपूर्ण २४ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश मिळून पाषाण-सुतारवाडी रस्त्याच्या कामासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती रोहिणी चिमटे यांनी दिली.

या निधीमुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि आवश्यक विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सुतारवाडी परिसरातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होईल. तसेच परिसरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

See also  पाषाण येथे आमदार निधीतून उभारले बस थांबे.