विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता

0
slider_4552

मुंबई :

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी  विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा  दिल्यानंतर सध्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीविनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावरुन विरोध पक्ष असलेल्या भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकेचा भडीमार केला होता. अशास्थितीत मंगळवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात तशी चर्चा सुरु झाली आहे.

मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षाचे मोठे नेते निर्णय घेऊन विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना आमदारांना पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. पुढील 2 दिवस सभागृह संपेपर्यंत उपस्थिती महत्वाची असल्याचं शिवसेना आमदारांना सांगण्यात आलं आहे.
काँग्रेसने बैठक बोलावली

मंगळवारी सकाळी 10 वाजता काँग्रेस पक्षाची विधानभवनात महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते आणि आमदार उपस्थित असणार आहेत. काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आग्रही भूमिका मांडण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत मतभेद पाहायला मिळाले. काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मागणीला राष्ट्रवादी आणि शिवसेना मंत्र्यांनी विरोध केल्याचं कळतंय. दरम्यान, सकाळी 10.30 वाजता महाविकास आघाडी समन्वय समितीच्या नेत्यांचीही बैठक होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन गाजण्याची शक्यता आहे.

नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार?

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांचे नेते याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं पटोले यांनी सांगितलं होतं. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा सुरु होती.

See also  शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ४४ साखर कारखाने लाल यादीत

विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला?

त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेनेत देवाणघेवाणीची प्राथमिक चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत होती. काँग्रेसनं उपमुख्यमंत्रीपदामध्ये रस दाखवल्याचं कळतंय. त्यासाठी शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता त्यावेळी व्यक्त केली जात होती. दरम्यान, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली. तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत, ते संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काही फेरबदल होऊन शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळेल का? याबाबत कुणाचीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही.