विधानसभेच्या सभागृहात गोंधळ घातलेल्या भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन

0
slider_4552

मुंबई :

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही ठराव करून १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठराव संमत झाल्यानंतर फडणवीस चांगलेच संतापले. भाजपा आमदारांच्या निलंबनानंतर सभागृहात बोलताना म्हणाले,”याठिकाणी जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आलेला आहे. लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे. विरोधीपक्षाची संख्या कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो म्हणून हा प्रयत्न आहे. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकतोय. हे एकतर्फी कामकाज आहे. हे मोगलाईचं कामकाज आहे. असं कामकाज आम्ही सहन करणार नाही,” असा संताप व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना उपाध्यक्षांच्या दालनात अपशब्द वापरल्याचा आरोप काही सदस्यांवर होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदनात खुलासा केला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आक्रमकपणे आपली बाजू मांडली. भाजपच्या आमदारांनी आई बहिणीवरून शिव्या दिल्याचे त्यांनी सदनात सांगितले.

See also  मास्क न वापरल्या बद्दल अजित पवारांनी रोहित पवारांना खडसावले