मुंबई :
देशातील प्रमुख कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) आता सीएनजी सेगमेंटमध्येही अग्रेसर होण्याचे ठरवले आहे. आम्ही असे म्हणत आहोत कारण, कंपनीच्या हॅचबॅक टियागो आणि कॉम्पॅक्ट सेडान टिगॉरच्या सीएनजी वाहनांविषयीच्या गेल्या काही दिवसांपासू चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रॉझच्या सीएनजी व्हेरिएंटची चर्चाही सुरु आहेत. दरम्यान, आता अशी माहिती मिळाली आहे की, Tata Tiago CNG साठी डीलरशिप्सवर बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे.
सध्याच्या टियागोची एक्स शोरुम किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते, तर या कारच्या टॉप व्हेरिअंटसाठी ग्राहकांना 7 लाख रुपये मोजावे लागतील. लाँचिंगनंतर या कारची बाजारात मारुती वॅगनआर सीएनजी, मारुती सेलेरियो सीएनजी, ह्युंडई आय-10 सीएनजी अशा शानदार गाड्यांसोबत स्पर्धा असेल.
Tata Tiago CNG कारच्या किंमतीबाबत कंपनीने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही, मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या टियागोपेक्षा सीएनजी व्हेरिएंटची किंमत 1 लाख रुपयांनी जास्त असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ग्राहक 5,000 रुपयांच्या टोकन अमाउंटवर निवडक टाटा डीलरशिप्समधून ही कार बूक करू शकतात. काही डीलरशिप्समध्ये नवीन Tiago CNG साठी अनधिकृत बुकिंग स्वीकारण्यास देखील सुरूवात झाली आहे. दिवाळीपर्यंत टाटा मोटर्सची नवीन Tiago CNG लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार काही दिवसांपूर्वी टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली होती.
Altroz CNG ची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर!
दरम्यान, आता टियागो आणि टिगॉरप्रमाणे प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रॉझच्या सीएनजी व्हेरिएंटची चर्चाही सुरु झाली आहे. या चर्चा सत्यात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे. नुकताच Altroz कारचा उत्सर्जन चाचणी किटसह (एमिशन टेस्टिंग किट) एक फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.
रशलेनने हा फोटो प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये Altroz च्या मागील बाजूस एमिशन टेस्टिंग किट बसवले आहे. कारच्या लुकमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. पण फोटो पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की, टाटा लवकरच बाजारात Altroz CNG लाँच करू शकते. मात्र, Altroz CNG लाँच करण्याबाबत टाटा मोटर्स कडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Altroz चे CNG व्हेरिएंट आले तर यामध्ये 1.2 लीटर थ्री-सिलिंडर नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन दिसेल. जे 86 अश्वशक्तीची उर्जा (हॉर्स पावर) आणि 113 न्यूटन मीटर पीक टॉर्क निर्माण करते. साहजिकच CNG मध्ये, कारचे पॉवर आउटपुट कमी होईल. अशा परिस्थितीत, Altroz CNG मध्ये 10-14 हॉर्स पावर कमी उर्जा उत्पादन करू होईल.