एमजी मोटर इंडियाने दाखविला फोर्डच्या उत्पादन प्रकल्पांना विकत घेण्यात रस

0
slider_4552

नवी दिल्ली:

एमजी मोटर इंडियाने फोर्डच्या साणंद आणि चैन्नई येथील उत्पादन प्रकल्पांना विकत घेण्यात रस दाखवल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून समोर येते आहे.

फोर्ड या जगप्रसिद्ध अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनीने भारतातील आपले वाहन उत्पादन थांबवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर एमजी मोटर इंडिया यात रस घेते आहे. एमजी मोटर ही इंग्लंडमधील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी आहे. दोन्ही कंपन्यांमधील बोलणी अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याची माहिती आहे. फोर्डच्या साणंद येथील उत्पादन प्रकल्पातील उत्पादन यावर्षीच्या चौथ्या तिमाहीपर्यत बंद होईल तर चैन्नई येथील उत्पादन प्रकल्पातील उत्पादन पुढील वर्षी सप्टेंबरअखेर बंद होणार आहे. अर्थात अद्याप फोर्ड आणि एमजी मोटर यांनी मात्र अधिकृतपणे यासंदर्भात कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

विविध कंपन्याशी फोर्डची बोलणी सुरू

फोर्डने विविध पर्यायांचा विचार केल्यानंतर कंपनीची पुनर्बांधणी करण्यासाठी कंपनीचे उत्पादन प्रकल्प, भागीदाऱ्या, कंत्राटी उत्पादन क्षमता इतर ऑटोमोबाईल कंपन्यांना विकण्यापासून इतर विविध पर्यायांचा विचार केला आहे. कंपनीचे उत्पादन प्रकल्प इतर कंपन्यांना विकण्याचा पर्याय अद्याप विचाराअंती आहे, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. सध्या फोर्ड वेगवेगळ्या ऑटोमोबाईल कंपन्यांशी बोलणी करते आहे, यात महिंद्रा अॅंड महिंद्रा, ओला इलेक्ट्रिक यांचादेखील समावेश आहे.

फोर्डचे हजारे कर्मचारी होणार बेरोजगार

एमजी मोटर ही एक ब्रिटिश कंपनी असली तरी सध्या चीनकडे तिचा मालकीहक्क आहे. एमजी मोटरने याआधीच फोर्डकडे आपली ऑफर ठेवली आहे. कोरोनामुळे फोर्ड आपल्या विस्ताराच्या योजना रद्द केल्या आहेत. तामिळनाडू सरकार फोर्डच्या उत्पादन प्रकल्पांशी निगडीत व्यवहार आणि परवानग्यांसंदर्भात सर्व सहकार्य करणार आहे. फोर्डला भारतीय बाजारपेठेत टिकून राहणे अशक्य झाल्यामुळे येथील उत्पादन प्रकल्प सुरू ठेवणे देखील तोट्याचेच ठरत होते. फोर्डने भारतातील आपले दोन मोठे उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या उत्पादन प्रकल्पांमधील हजारो कर्मचारी बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कंपनीची पुनर्बांधणी करण्यासाठी घेतला निर्णय

See also  डॉ. प्रदीप महाजन यांची कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 'स्टेम सेल' आधारित एक पद्धत विकसित

फोर्डने म्हटले आहे की भारतातील उत्पादन प्रकल्प बंद करणे, पुनर्बांधणी करणे, इत्यादी बाबींसाठी कंपनीला २ अब्ज डॉलरचा खर्च येणार आहे. यात २०२१ मध्ये ६० कोटी डॉलर आणि २०२२ मध्ये १.२ अब्ज डॉलरचा खर्च होणार आहे. फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम फार्ले यांनी कंपनीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतल्यावर कंपनीने भारतातील दोन मोठे उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा आणि हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

फोर्डला नफ्यात आणण्यासाठीची पावले

फोर्डच्या या निर्णयामुळे ४,००० कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. फोर्ड भारतात काही किरकोळ स्वरुपातील सहाय्यकारी कामकाज सुरू ठेवणार आहे. मागील दशकभरात फोर्डला भारतातील कामकाजामुळे २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त तोटा झाल्यामुळे कंपनीला भारतातून आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. मागील वर्षी सीईओपदाची सूत्रे घेतल्यानंतर फार्ले यांनी फोर्ड प्लस ही कंपनीला नफ्यात आणण्याची योजना अंमलात आणण्यास सुरूवात केली आहे. भारतातील प्रकल्प बंद करण्याचा निर्णय हा त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे.