पर्यावरणाचे काम करण्यासाठी क्रांती घडायला हवी….!
बाणेर :
औंध, बाणेर , बालेवाडी ,पाषाण परिसरा तील विविध विषयांवर चर्चा करण्या साठी आयोजित करण्यात येणाऱ्या “गिरिधर कट्टा” या उपक्रमाच्या व्यासपिठावर या वेळी परिसरातील पर्यावरण प्रेमी तसेच राजकीय प्रतिनिधींच्या स्मार्ट गप्पा रंगल्या. परिसरातील विविध समस्या व त्यावरील करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात गिरीधर कट्टा या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी या गिरीधर कट्टा चे आयोजन करण्यात येते.
यावेळेस चा दुसरा गिरीधर कट्टा हा पर्यावरणप्रेमी नागरिकांचा समवेत घेण्यात आला. यावेळी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या त्यावर उपस्थित असलेल्या सर्व राजकीय आजी-माजी प्रतिनिधींनी विविध उपाययोजना करून कृतीतून या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.
पर्यावरण प्रेमी शैलेंद्र पटेल यांनी बोलताना सांगितले की, बावधन गावठाणा जवळ राम नदीवर लगत असलेला ओढ्यामध्ये झरा वाचवला पाहिजे. बारा महिने चोवीस तास वाहत असणारा हा झरा वाचला तर भविष्यात या ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवणार नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा असलेला हा झरा वाचवल्यास लाखो लिटर पिण्यायोग्य पाणी मिळणार आहे. तसेच भावी पिढीला पाण्याच्या अभ्यासासाठी या झऱ्याचा उपयोग होईल, या झऱ्याचे नगर विकास आराखड्यात आरेखन करण्यात यावे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. झऱ्याची जागा वाचवण्याचा कायदा आहे परंतु त्याचे अंमलबजावणी होत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. आपल्या सर्व राजकीय प्रतिनिधीची यामध्ये मदत हवी असल्याचे पटेल यांनी गिरीधर कट्ट्यावर सांगितले.
पर्यावरण प्रेमी पांडुरंग भुजबळ म्हणाले की,
बाणेर टेकडी वर पर्यावरण प्रेमी मुळे एक वेगळ्या प्रकारचे नंदनवन पाहायला मिळते. तुकाई टेकडीवर नुसते झाडे लावण्याचा उद्देश नसून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहायला मिळतील व अभ्यासासाठी संशोधनासाठी याचा उपयोग झाला पाहिजे. या ठिकाणी सहाशे प्रकारच्या झाडांच्या प्रजाती पाहायला मिळतात. वेगवेगळी जैवविविधता तुकाई टेकडीवर पाहायला मिळावी हे उद्दिष्ट आहे. पाणी आणि लाईट ही मूलभूत सुविधा या ठिकाणी भेडसावत आहे त्यावर काम करणे आवश्यक आहे. थ्री फेज कनेक्शन ला प्रॉब्लेम येत असल्यामुळे पाणी टेकडीवर पोचवण्यात समस्या निर्माण होते. महावितरणाचा वारंवार पाठपुरावा करून देखील लाईटची समस्या सुटत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. झाडांना लाईट आणि पाण्याची व्यवस्था करावी एवढीच मागणी वसुंधरा अभियानाच्या वतीने करण्यात आली.
वसुंधरा स्वच्छता अभियानाचे अनिल गायकवाड यांनी सांगितले की, पर्यावरणाचे काम करण्यासाठी क्रांती घडायला हवी आहे. ग्लोबल वॉर्मिंग समोर दिसणारे दृश्य खूप भयानक आहे. परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही. सर्व गणित फक्त आर्थिक हितासाठी जपली जात आहेत. परंतु पर्यावरणामध्ये काम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. पृथ्वी वाचवण्यासाठी 40 कलमी कार्यक्रम राबवण्याचा आवश्यकता आहे. या चाळीस कलमी कार्यक्रमच्या व्याख्यानाचे आयोजन पाषाण शाळेत केले जाणार आहे. यावेळी आपण यावे असे आवाहनही गायकवाड यांनी केले.
गणेश कलापूरे यांनी सांगितले की, मुळा व राम नदीच्या संगमाजवळ जैवविविधता पार्क करण्यात आले असते, इतका चांगला परिसर तो होता. परंतु या ठिकाणी पर्यावरणाची हानी केली गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शाश्वत जीवन शैली कडे वळले पाहिजे.
संजय मुरकुटे यांनी सांगितले की, प्रत्येक सोसायटीने मैला पाणी शुद्धीकरण यावर लक्ष दिले पाहिजे टेकडी कडेला असलेल्या सोसायट्यांनी पाणी शुद्धीकरण करून टेकडीवरील झाडांना कसे वापरता येईल याचा प्रयत्न करून पर्यावरणाला मदत करावी असे सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तपकीर, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुरकुटे, वसुंधरा स्वच्छता अभियान चे अनिल गायकवाड, पर्यावरण प्रेमी शैलेंद्र पटेल, वसुंधरा अभियान चे पांडुरंग भुजबळ, संजय मुरकुटे , गणेश कलापुरे , पुणे भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, ॲड. आशिष ताम्हाणे, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, युवा नेते सचिन दळवी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश बालवडकर, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग अध्यक्ष विशाल विधाते, नितीन कळमकर, माणिक गांधीले, अर्जुन ननावरे, प्रवीण आमले तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.