पॅरीस :
नोवाक जोकोविचने हंगामाअखेरीस जागतिक क्रमवारीत विक्रमी सातव्यांदा आपले अव्वल स्थान राखले. या विक्रमी कामगिरीमुळे त्याला यंदा चारही ग्रॅण्डस्लॅम जिंकू न शकल्याच्या दुःखातून काहीसा दिलासा मिळाला.
सर्बियाचा 34 वर्षीय जोकोविच यापूर्वी पीट सॅम्प्राससोबत संयुक्तपणे विक्रमवीर होता, परंतु पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना जोकोविचने पोलंडच्या ह्युबर्ट हुर्काझचा 3-6, 6-0, 7-6 (7/5) असा पराभव केला आणि त्याने पीट सॅम्प्रसचा विक्रम मोडीत काढला.
सप्टेंबर महिन्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डॅनिल मेदवेदेवने जोकविचचे ग्रॅण्ड स्लॅम स्वीप करण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर जोकोविचने सात आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. या आठवड्यात पुनरागमन करण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब करणे व विक्रम मोडणे हेच होते, असे 20 वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारा जोकोविच म्हणाला. मी लहान असताना पीट सॅम्प्रस हा माझा आदर्श होता. आज त्याचा विक्रम मोडणे हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. हे यश केवळ माझे नसून माझ्या संघाचे आहे. या स्थितीत असणे हे आश्चर्यकारक आहे, असे तो म्हणाला. आता जोकोविचचा अंतिम सामना रशियाच्या डॅनिल मेदवेदेव किंवा अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होईल. झ्वेरेव्ह हा व्हिएन्ना येथे वर्षातील पाचवे विजेतेपद जिंकून पॅरिसमध्ये दाखल झाला आहे.