मुंबई :
किदांबी श्रीकांत याचं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप जिंकण्याचं स्वप्न तुटलं आहे. रविवारी झालेल्या फायनलमध्ये श्रीकांतचा सिंगापूरच्या लोह कीन येवने 21-15, 22-20 असा पराभव केला.
दोन्ही खेळाडूंमधला हा मुकाबला 43 मिनीटं चालला. पराभव झाला असला तरी श्रीकांत सिल्व्हर मेडल जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. किदंबी श्रीकांतने या सामन्यात चांगली सुरुवात करत इंटरवलपर्यंत 11-7 ची आघाडी घेतली, पण विश्रांतीनंतर त्याची लय बिघडली. काही सोप्या चुका श्रीकांतला नडल्या, ज्यामुळे लोह कीन येवने 18-14 ची आघाडी घेतली.
सिंगापुरी खेळाडूने पहिला गेम फक्त 16 मिनिटांमध्ये 21-15 ने जिंकला. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला श्रीकांतने 7-5 ची आघाडी घेतली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्याचा खेळ गंडला आणि लोह कीन येवने 11-9 पर्यंत बढत घेतली. पिछाडीवर पडल्यानंतर श्रीकांतने पुन्हा एकदा पुनरागमन करत 18-16 ची आघाडी घेतली होती. पण लागोपाठ चार पॉईंट्स घेऊन लोह कीन येवने 20-18 ची आघाडी घेतली, यानंतर श्रीकांतने दोन मॅच पॉईंट वाचवत मुकाबला 20-20 च्या बरोबरीत आणला, पण श्रीकांतला त्याची ही लय कायम ठेवता आली नाही आणि अखेर त्याला सामना गमवावा लागला.
किदांबी श्रीकांत वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. 1983 साली प्रकाश पादुकोण यांनी याच स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. यानंतर 2019 साली बी साई प्रणीत आणि यावेळी लक्ष्य सेननेही ब्रॉन्झ मेडलवर आपलं नाव कोरलं. 28 वर्षांच्या श्रीकांतने सेमी फायनलमध्ये भारताच्याच लक्ष्य सेनचा 69 मिनिटं चाललेल्या सान्यात 17-21, 21-14, 21-17 ने पराभव केला होता. तर लोह कीन येवने दुसऱ्या सेमी फायनलमध्ये डेन्मार्कच्या आंद्रेस एंटोसेनला मात दिली होती.