राजस्थान रॉयल्स ने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ७ विकेट्स राखून पराभव करून केला अंतिम फेरीत प्रवेश…

0
slider_4552

अहमदाबाद :

शुक्रवारी (२७ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात अहमदाबादच्या मैदानावर आयपीएल २०२२चा दुसरा क्वालिफायर सामना खेळला गेला.

राजस्थानने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश केला. राजस्थानच्या विजयाचा नायक राहिला जोस बटलर. सलामीवीर बटलरने पुन्हा एकदा या सामन्यात शतकी तडाका केला. या शतकी खेळीसह त्याने विक्रमांची रास घातली आहे.

अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या बेंगलोरविरुद्धच्या या सामन्यात बटलरची बॅट चांगलीच तळपली. बटलरने नेहमीप्रमाणे सलामीला फलंदाजीला येत खोऱ्याने धावा काढल्या. पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेत त्याने २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढे हीच आक्रमकता कायम राखत त्याने शतकही (Jos Buttler Century) पूर्ण केले. तो डावाअखेर ६० चेंडूत १०६ धावांवर नाबाद राहिला. या शानदार खेळीदरम्यान त्याने ६ षटकार आणि १० चौकारही मारले आहेत.

हे बटलरचे आयपीएल २०२२मधील चौथे शतक आहे. तर त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पाचवे शतक आहे. यासह बटलरने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमात विराट कोहलीची बरोबरी केली आहे. विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ५ शतके केली होती. या विक्रमी यादीत बटलरने शेन वॉटसन, डेविड वॉर्नर आणि केएल राहुल यांना मागे टाकले आहे. या तिघांनीही आयपीएलमध्ये प्रत्येकी ३ शतके केली आहेत. आता बटलर सर्वाधिक ६ शतके करणाऱ्या ख्रिल गेलपासून फक्त एक पाऊल दूर आहे.

याबरोबरच बटलर राजस्थान संघाकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने राजस्थानकडून सर्वाधिक ५ शतके केली आहेत. त्याच्यानंतर अजिंक्य रहाणे, कर्णधार संजू सॅमसन आणि शेन वॉटसन प्रत्येकी २ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान बटलरच्या आयपीएल २०२२मधील प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्याने राजस्थानकडून १६ सामने खेळताना ५८.८६च्या सरासरीने ८२४ धावा केल्या आहेत. यासह तो आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून ऑरेंज कॅपही त्याच्याच डोक्यावर सजली आहे.

See also  टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील नेमबाजांना सरावासाठी केवळ २० मिनिटांचा वेळ