भारताचा आयर्लंडवर अखेरच्या चेंडूवर निसटता विजय.

0
slider_4552

डबलिन :

आयर्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना मंगळवारी (२८ जून) डबलिनमध्ये खेळला गेला. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता आणि त्यानंतर आता दुसरा सामना देखील भारतीय संघाच्याच नावावर झाला.

संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांच्या जबदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताने ४ धावा राखून हा विजय मिळवला. आयर्लंडच्या फलंदाजांनी देखील कडवे आव्हान दिले.

भारतीय संघ या मालिकेत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळत असून दुसऱ्या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून हार्दिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीसाठी संजू सॅमसन आणि इशान किशन आले. इशान अवघ्या ३ धावा करून बाद झाला. पण सॅमसनला मोठ्या काळानंतर राष्ट्रीय संघात संधी मिळाल्यामुळे त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने ४२ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या.

तसेच तिसऱ्या क्रमांकावरील दीपक हुड्डाने दमदार फलंदाजी करत शतक ठोकले. हुड्डाने अवघ्या ५५ चेंडूत शतक पूर्ण केले असून ५७ चेंडूत १०५ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि ६ षटकार ठोकले. या दोघांव्यतिरिक्त भारताचा दुसरा एकही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल हे तिघेही शून्य धावांवर बाद झाले. मर्यादित २० षटकांमध्ये भारतीय संघाने ७ विकेट्स गमावल्या आणि तब्बल २२५ धावा केल्या.

प्रत्युत्तरात आयर्लंड देखील शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत होता. शेवटच्या चेंडूवर त्यांंना विजयासाठी ५ धावांची गरज होती, पण फलंदाज षटकार मारू शकला नाही. आयर्लंडचा संघ जेव्हा लक्ष्या पाठलाग करण्यासाठी मैदानात आला, तेव्हा त्याचे सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँडी बालबिर्नी यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी अनुक्रमे ४० आणि ६० धावांचे योगदान दिले. त्यानंतर हॅरी टेक्टरने महत्वाच्या ३९ धावा केल्या. जॉर्ज डॉकरेल आणि मार्क ऍडायर यांनी शेवटपर्यंत खिंड लढवली. या दोघांनी शेवटच्या षटकांमध्ये अनुक्रमे ३४ आणि २३ धावा केल्या. या दोघांच्या शेवटच्या षटकातील योगदानामुळे सामन्याचा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला.

See also  भारताची स्टार तिंरदाज दीपिका कुमारीने तिरंदाजी विश्वचषक २०२१ मध्ये मिळवले तिन सुवर्ण

गोलंदाजांमध्ये आयर्लंडसाठी मार्ग ऍडायरने चार षटकात ४२ धावा खर्च करून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. जोश ललितने चार षटकात ३८ धावा आणि क्रेग यंगने चार षटकात ३५ धावा खर्च करून प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. भारतासाठी भुवनेश्वर कुमार (४६), हर्षल पटेल (५४), रवी बिश्नोई (४१), उमरान मलिक (४२) या चौघांनी देखील प्रत्येक एक-एक विकेट घेतली.