पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ‘टाइम्स हायर एज्युकेशन आशिया अवॉर्ड २०२२’ चे ‘द डेटा पॉइंट रिसर्च इम्प्रुवमेंट अवॉर्ड’ जाहीर झाले आहे.
संशोधन क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल मिळालेला हा पुरस्कार असून यामुळे विद्यापीठाने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे.
आशिया खंडातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांचे मूल्यमापन करत दरवर्षी टाइम्स हायर एज्युकेशन यांची क्रमवारी जाहीर करते. मागील काही वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कामगिरी सातत्याने उंचावत असून आता या पुरस्काराने यात अजून भर घातली आहे.
टाइम्स हायर एज्युकेशनने आशियातील विद्यापीठांच्या संशोधनाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले. यामध्ये पाचशे विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधून अंतिम गटात आठ शैक्षणिक संस्थांची संशोधनातील कामगिरी उत्तम होती, त्यामधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वोत्तम ठरले आहे.
विद्यापीठाचे संशोधन हे उत्पादकता वाढविण्यासोबत संदर्भसुची म्हणूनही याचा मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचे निरीक्षणही यात नोंदवले आहे. २०११ ते २०२० या कालावधीत संशोधन दुप्पट झाले असून याचा संदर्भ म्हणून व माहितीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना उपयोग झाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळालेले यशाबद्दल सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी अभिनंदन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या संचालिका डॉ.सुप्रिया पाटील आदी उपस्थित होते.
विद्यापीठाला संशोधनासाठी मिळालेलं हे अवॉर्ड विद्यापीठाच्या गुणवत्तेची पावती आहे. हे यश सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व विद्यापीठाशी संलग्न सर्व घटकांचे आहे. भविष्यात मीही विद्यापीठाच्या या कामगिरीत भर घालून आणखी उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीन.