शिक्षणातून ज्ञानाकडे वाटचाल होणे गरजेचे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
slider_4552

पुणे :

विद्यापीठ हे केवळ शिक्षणामुळे ओळखले जात नाही, तर शिक्षणाबरोबरच ज्ञानाधारित समाजनिर्मितीमध्ये विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असते. शिक्षणातून ज्ञानाकडे वाटचाल होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

आपल्याकडील स्टार्टअप, इनोव्हेशन, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि आपली युवाशक्ती या माध्यमातून आपण जगाला विकासाकडे नेत आहोत, असे त्यांनी सांगितले. ही खरी भारत विश्वगुरू होण्याकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे ते पुढे म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) कार्यक्रमांतर्गत आयोजित युवा संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

शिक्षण हे केवळ ज्ञानाधिष्ठित न राहता समग्र व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या दृष्टीकोनातूनच द्यायला हवे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे याच दिशेने प्रवास करत असून महाराष्ट्राला अभिमान वाटावा असेच हे विद्यापीठ आहे, असे गौरोद्गार राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी तिरंगा हात घेत स्वतःचा फोटो काढत या अभियानाला सुरुवात केली.

यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र. कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उपक्रमाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सिद्धार्थ शिरोळे, शिवेंद्रराजे भोसले, सुनील कांबळे तसेच अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात तीन हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली.

विद्यापीठाच्या स्थापनेला आता ७३ वर्ष पूर्ण होत आहेत. पुढील दीड वर्षात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, तंत्रज्ञान, स्टार्टअप अशा सर्व क्षेत्रात आपली सर्वांगीण प्रगती होण्याच्या दृष्टीने बृहत् आराखडा करण्याचे काम आम्ही आतापासूनच सुरू केले आहे. हे अभियान केवळ विश्व विक्रमासाठी नसून राष्ट्रप्रेमाची भावना मनात तेवत राहावी म्हणून हा उपक्रम आपण राबवत आहोत. असे डॉ.कारभारी काळे म्हणाले.

See also  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश याच्यासह पाच जणांवर मोक्का लागू

भारतासाठी बलिदानाची वेळ आली तर ते आपण करूच पण आता भारतासाठी मरण्याची आवश्यकता नसून चांगले काम करत देशाचे मान उंचावण्याची गरज आहे. असे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाच लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमांतून गिनीज विश्वविक्रम – राजेश पांडे

स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा अभियानाची माहिती देताना राजेश पांडे म्हणाले, ७५० हून अधिक महाविद्यालये, ६५ हजार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, ३ हजारहून अधिक प्राध्यापक यांच्या एकत्रित प्रयत्नातून ५ लाखाहून अधिक विद्यार्थी व नागरिक यांच्यापर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न आहे. तिरंगा हातात घेत काढलेल्या दीड लाख फोटोंच्या माध्यमातून गिनीज बुक मध्ये या जागतिक विश्व विक्रमाची नोंद या निमित्ताने केली जाणार आहे.

यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. प्रभाकर देसाई, सर्व अधिकार मंडळाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय चाकणे यांनी केले तर आभार डॉ.प्रफुल्ल पवार यांनी मानले.