मुंबई :
पुणे गणपती विसर्जन मिरवणूक याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. तर विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका करणं चुकीचं असल्याचं सरकारनं कोर्टात सांगितलं आहे.
पुण्यातल्या गणपती विसर्जनाचा सोहळा आता काही दिवासांवर आला आहे. अशातच मानाच्या मिरवणुकींवरून सुरु झालेल्या वादावरील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. मुंबई हायकोर्टात आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला यावेळी ‘बढाई समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात आव्हान दिलं होतं. या अटी आणि परंपरा संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे, असा दावा करत बढाई यांनी कोर्टात आव्हान दिलं होतं. मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. हायकोर्टात याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.
पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक ही राज्यभरातील भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. पुण्यातील हजारो मंडळं सुंदर असे विसर्जन रथ तयार करून, त्यावर गणपती बाप्पाला ठेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या मिरवणुकीत मनाच्या पाच गणपतींचं विसर्जन होता होता दिवस संपून जातो. त्यामुळं इतर हजारो मंडळांना ताटकळत राहावं लागतं. पोलीस आणि प्रशासनाकडे याबाबत अनेकदा दाद मागून देखील दखल न घेतली गेल्यानं पुण्यातील गणेश मंडळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या या वादाला मोठा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे, 1894 ला पुण्यातील गणेश मंडळांमध्ये आधी विसर्जन कोणी करायचं यावरून वाद निर्माण झाला. हा वाद लोकमान्य टिळकांपर्यंत पोहचल्यावर पुण्याचं ग्रामदैवत म्हणून विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपतीला, पुण्याची ग्रामदेवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला राहील असं ठरलं. पुढे तिसरा मान गुरुजी तालीम, चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा या गणेश मंडळांना राहील अशी प्रथा रूढ झाली.