शिवाजीनगर :
पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन मंगळवार, दिनांक ०६/०९/२२ रोजी, दुपारी २.०० वा. जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल येथे लोकसभा खासदार मा. अमोल कोल्हे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख साहेब व पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे हे उपस्थित होते.







याप्रसंगी डॉ. कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास उलगडून सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायदे रयतेवर अंकुश ठेवण्यासाठी केले नव्हते तर त्यांच्या रक्षणासाठी व त्यांच्या कल्याणासाठी केले होते. महिलांना समानतेची वागणूक ही केवळ बोलण्यातून नव्हे तर आपल्या कृतीतून दिली पाहिजे. शिवचरित्रातून नैतिकता हा गुण घेण्यासारखा आहे. कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा पेशा मध्ये नैतिकता ठेवून काम केले की, कारकीर्द यशस्वी होते. तसेच कालाक्षेत्र हे एक प्रकारच्या टाईम मशीन सारखे आहे. कलाकाराला भूमिका करत असताना विशिष्ठ काळात जाऊन तो काळ जगता येतो. तसेच डॉ. कोल्हे यांनी उपस्थितांशी संवाद साधला व प्रश्नांचे निराकरण केले.
तसेच याप्रसंगी बोलताना पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख साहेब हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आई वडिलांचे आज्ञाधारक होते. महाराजांचा हा गुण आपण प्रत्येकानं आत्मसात करायला हवा.
तसेच पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष पांडुरंग थोरवे म्हणाले की, प्रगल्भ आणि धारदार वाणी असणारे अमोल कोल्हे यांचे व्याख्यान हा वकिलांसाठी आनंदाचा योग आहे. शिवचरित्र हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. आणि खऱ्या अर्थाने जे शिवचरित्र जगले असे डॉ कोल्हे यांच्या माध्यमातून वकील बांधवांपर्यंत पोहचावे यासाठी सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील यांनी केले. तसेच पुणे बार असोसिएशन चे कार्यकारिणी सदस्य ऍड. सई देशमुख यांनी आभार मानले.
याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड विवेक भरगुडे, सचिव ॲड. अमोल शितोळे, सचिव ॲड. सुरेखा भोसले खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस- ॲड.शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले, ऍड. अमोल दुरकर ॲड.तेजस दंडागव्हाळ,ॲड, कुणाल अहिर आणि रितेश पाटील तसेच मोठ्या संख्येने वकील व न्यायालयीन कर्मचारी बांधव उपस्थित होते








