पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटर प्रवेशद्वार फलक फाडले : कारवाई करण्याची मागणी

0
slider_4552

मुंबई :

काल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे उदघाटन केले होते. पोवई नाका भागात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ग्रेडसेप्रेटर बांधण्यात आला आहे. गेल्या पावणेतीन वर्षांपासून याचं काम सुरु होतं. ग्रेडसेप्रेटरचं काम पूर्ण झालं आहे. मात्र, मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करावयाचे असल्याने याचे उदघाटन रखडले होते.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाची मागणी सुरू झाल्यानंतर उदयनराजे यांनी लगेचच पाहणीचे नियोजन करण्याचे आदेश सातारा विकास आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यानुसार ते आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले. याचवेळी त्यांनी अचानक उदघाटन उरकून घेऊन याचे लोकार्पण देखील केले होते.

या ग्रेडसेप्रेटरच्या एका प्रवेशद्वाराचे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्यात आले होते. तसा नामफलक देखील लावण्यात आला होता. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. दरम्यान, सातारा शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसंच भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेयांनी जमवलेल्या गर्दीची चौकशी करणार असल्याचेही सांगितले आहे. दरम्यान, सर्वच स्थरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी, ‘संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक ज्या समाजकंटकाने फाडला या समाजकंटकाला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी’ अशी मागणी करत या कृत्याचा निषेध केला आहे.

See also  केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोण....?