मुंबई :
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मनसे आता रस्त्यवर उतरली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट् नवनिर्माण सेनेच्या जागर यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. महामार्गावर पळस्पे फाटा येथून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली.




एकूण आठ टप्प्यात पदयात्रा निघणार असून प्रत्येक टप्प्यात १५ किलोमीटरची पदयात्रा असणार आहे. यावेळी बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटलं की, नागरिकांचा मी राग बघतोय. मागील १७ वर्षापासून मुंबई- गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही. एक रस्ता बांधायला सरकारला १७ वर्षात पूर्ण करता येत नाही, काय बोलायचं कळत नाही. मनसेचे हे आंदोलन आता शांततेत मात्र यापुढ़े आंदोलन झालं तर कसं होईल याबाबत मी काहीच सांगू शकत नाही.
गणपतीपर्यत किंवा या वर्षअखेरपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होईल, असं आश्वासन प्रशासनाने दिलं आहे. मात्र तसं झालं नाही तर नागरिकांचा संताप तुम्हाला नक्की दिसेल. या रस्त्यावर २५०० लोक मृत्यूमुखी पडलेत त्या लोकांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार. त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायचं नाही का? असा प्रश्नही अमित ठाकरेंना टीकाकारांना केला.
आम्ही आता शांततेत आंदोलन करत आहोत, नंतर माहित नाही आंदोलन कसं असेल. मनसे आधी हात जोडून आंदोलन करते, नंतर हात सोडून आंदोलन करते. राज साहेबांनी सभा घेऊन या रस्त्यात किती भ्रष्टाचार झाला सांगितलं आहे. त्यामुळे लवकर सुधरा, अन्यथा अंगावर येणारच, असा इशाराही अमित ठाकरे यांनी दिला आहे.








