जालना :
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ( ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे आज राज्याच्या विविध भागांमध्ये संतप्त पडसाद उमटले. मराठा समाजाच्या कार्यकत्यानी ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. जालना आणि धाराशिवमध्ये बंदला हिंसक वळण लागले. राज्य सरकारने लाठीमार करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन देतानाच जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
त्यानंतर आता संपुर्ण घटनेची दखल गृहखात्याने घेतली आहे. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी संध्याकाळी हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गृह विभागाने ही कारवाई केली आहे.
१ सप्टेबरला घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात आजही उमटत आहेत. राज्यभरातील एसटी बस, आणि इतर घटकांवरतीही याचा मोठा परिणाम झाला आहे. राज्याच्या अनेक भागात जिल्हा बंद, शहर बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या (सोमवारी) देखील अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती संघटना, मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. काही मराठा कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्या पेटवल्या आहेत. या संघटना आणि आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.