योगीराज पतसंस्थाने कठीण काळात सुद्धा आपले वेगळेपण व नाविन्य पण दाखवून दिले आहे : छत्रपती संभाजीराजे

0
slider_4552

बाणेर :

महाराष्ट्र हे सहकाराचे राज्य म्हणून संबोधले जाते, ते फक्त संबोधनापुरतेच उरले आहे. परंतु सहकार क्षेत्रामध्ये योगीराज नागरी पतसंस्थेने या कठीण काळात सुद्धा आपले वेगळेपण व नाविन्य पण दाखवून दिले आहे. योगीराज पतसंस्था ही सामाजिक कार्या बरोबरच आर्थिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. असे प्रतिपादन माजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांनी केले. योगीराज पतसंस्थेच्या वतीने भंडारा डोंगर ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांना “योगीराज भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

योगीराज पतसंस्थेच्या वतीने यावर्षीचा “योगीराज भूषण पुरस्कार” भंडारा डोंगर ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांना मा. खासदार छत्रपती संभाजीराजे, पालक मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये व मानपत्र पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच भंडारा डोंगर येथे होणाऱ्या तुकाराम महाराज मंदिरासाठी संस्थेच्या वतीने 5 लाख व उपस्थितांच्या वतीने असे एकूण 1 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल वसुंधरा अभियान, माऊंट मेरू शिखर मोहीम सर करणारे गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्था यांचा प्रत्येकी 51 हजार निधी देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल श्रीराम समर्थ पतसंस्था व बाणेर नागरी पतसंस्था यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


पुढे बोलताना संभाजी राजे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात झालेल्या विविध संतांचे राजांचे सुसंस्कार आपल्यावर आहेत. यामुळे महाराष्ट्राचे वेगळेपण आज आपल्याला पहावयास मिळते आहे. तसेच राजेंनी गडकोट किल्ल्यांसाठी प्रश्न उपस्थित केला आपण उपस्थित आमदार काय करणार आहोत अशी त्यांनी यावेळी विचारले. साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गडकोट किल्ल्यांसाठी साडेतीनशे कोटी जाहीर केले. परंतु जून पासून अद्याप पर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. संस्कृत महाराष्ट्र घडवण्याची आता आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे असेही यावेळी नमुद केले.

पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी योगीराज पतसंस्था ही उत्कृष्ट कार्य करत आहे याची इतर संस्थानी दखल घेऊन कार्य करावे असे यावेळी सांगितले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, संस्थेने आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे अशीच प्रगती यापुढेही कायम राहील अशी आशा व्यक्त केली. भंडारा डोंगरा साठी केंद्रातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही सांगितले.

See also  पाषाण-सुतारवाडी परिसरातील रस्त्यांच्या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात : राहुल कोकाटे

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेची आर्थिक प्रगती व सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला. तसेच सभासदांना यावर्षी 13% लाभांश जाहीर केला. पतसंस्थेच्या माध्यमातून भंडारा डोंगरावर उभ्या राहणाऱ्या मंदिरासाठी आज जरी 1 कोटी रुपयांची देणगी दिली असली तरी मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत देणगी देण्याचे काम चालू राहील असेही यावेळी सांगितले.

याप्रसंगी बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील शेळके, मा. आमदार विलास लांडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, संचालक विकास दांगट, देहू संस्थान चे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे, मा. महापौर दत्तात्रय गायकवाड, मा. नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, उपनिबंधक निलम पिंगळे, उद्योजक विजय जगताप, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत माडगुळकर, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, धर्मवीर संभाजी बँकेचे अध्यक्ष बाबूराव शितोळे, इस्कॉनचे प्रभूजी, पुरंदर पंचायत समिती माजी सभापती रमेश जाधव, अशोक मुरकुटे, भगवान पठारे, चांगदेव पिंगळे, बाळासाहेब बराटे तसेच भंडारा डोंगर ट्रस्ट चे विश्वस्त, वारकरी संप्रदायातील मान्यवर, संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले.