आळंदी :
आळंदी येथील “स्वच्छता ही सेवा” या उपक्रमात आळंदी नगरपरिषद, विविध सेवाभावी संस्था, शाळा, सेवाभावी कार्यकर्ते, नागरिक, पक्ष संघटना, पदाधिकारी यांचे लोकसहभागातून शहरात स्वच्छता श्रमदानातून उत्साहात स्वच्छता अभियान पार पडले. या स्वच्छता श्रमदान मोहीमेत १५०० वर नागरिकांनी सहभागी होत सुमारे ९ टन कचरा संकलित झाल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.







केंद्र व राज्य सरकारच्या सूचनादेशा प्रमाणे स्वच्छता सेवा उपक्रम इंद्रायणी नदी घाटावर शासनाच्या सूचनादेशाने राबविण्यात आला. या सेवेच्या उपक्रमात तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात इंद्रायणी नदी परिसरात प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात विविध सेवाभावी संस्थांसह आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात श्री आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक सचिन शिंदे, अध्यापक रामचंद्र महाराज सारंग, हुतात्मा राजगुरू संघ अविनाश राळे, अनिल जोगदंड,हिरामण तळेकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे ज्ञानेश्वर घुंडरे, गोविंद तौर, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र समिती पिंपरी चिंचवडचे रवींद्र जाधव, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, भाजपचे विशेष निमंत्रक राम गावडे, एम.आय.टी कॉलेज, डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, इंद्रायणी सेवा फाऊंडेशन, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण इकाई, पतंजली, सीडीसीव्ही संस्थेचे प्रतिनिधी, पोलीस मित्र आदींनी आपापल्या संस्थाच्या माध्यमातून सहभाग घेतले.
अभियानात नागरिक, नगरपरिषदेच्या ४ शाळां, खाजगी श्रीमती लक्ष्मीबाई दुराफे विद्यालय , वारकरी, शिक्षक, शालेय मुले यांनी ” स्वच्छता ही सेवा ” या उपक्रमात सहभाग घेतला. या मोहिमेत इंद्रायणी नदीचे दुतर्फा घाट स्वच्छता प्रभावी पणे स्वच्छ करण्यात आले. इंद्रायणी नदी वरील भक्ती सोपान पुलावर महापुराच्या पाण्यात वाहून आलेली तसेच अडकलेली जलपर्णी काढून नगरपरिषदेच्या घंटागाड्यात भरून देवून सुपूर्द करण्यात आली. याशिवाय कचरा, लाकडे, प्लास्टिक वस्तू, पिशव्या, बाटल्या संकलन करून नगरपरिषद घंटागाडीत देण्यात आले. लहान मुलां पासून जेष्ठ नागरिकां पर्यंत या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. ते म्हणाले स्वच्छता ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया असून “स्वच्छता ही सेवा” या अभियानातून प्रेरणा घेवून प्रत्येक नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकण्यासह सार्वजनिक ठिकाणे आपल्या घरासारखी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केल्यास आळंदी शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल. आळंदी शहरात या स्वच्छता श्रमदानात सेवाभावी संस्थांनी, आळंदीकरांनी उत्स्फूर्त श्रमदान करीत इंद्रायणी नदी परिसर, भाजी मंडई, बस स्थानक, केंद्रे महाराज मठ परिसर, सिद्धबेट, काळे कॉलनी अशा १० ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवित सुमारे ९ टन कचरा संकलित करण्यात आला.








