पुणे :
पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या महंमदवाडी परिसराचे नामकरण महादेव वाडी करावे अशी मागणी शिवसेनेचे नेते आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना त्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.







या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील एका परिसराचे नाव महंमदवाडी असे आहे. मात्र या परिसराचे नाव महादेव वाडी करावी अशी मागणी पुण्यातील शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.
त्यावर शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे हे नामकरण करण्याची मागणी केली आहे.
भरत गोगावले यांच्या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीने दखल घेतली आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना तातडीने त्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नामकरणाचा हा प्रस्ताव लवकरच मान्य होऊन महमदवाडी चे नामकरण लवकरच महादेव वाडी होईल असा विश्वास नाना भानगिरे यांनी व्यक्त केला.








