पुणे :
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. दोनवेळा नोटीस बजावूनही त्याला साधे उत्तरही देण्यात आलेले नाही.







अशा 542 जणांनी पुढील 24 तासांत निवडणूक कामासाठी हजर न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी दिला आहे. हे 542 अधिकारी, कर्मचारी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील आहेत.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राव यांनी जिल्हा निवडणूक शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
या बैठकीत पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि इतर शासकीय खात्यांमधील ५४२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची ‘मतदान केंद्रस्तरीय अधिकारी’ (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत वारंवार पत्र, नोटीस पाठविण्यात आली.
पण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून साधे उत्तरही प्राप्त झालेले नाही, असे सांगण्यात आले. त्यावर पुढील24 तासांत संबंधित कर्मचारी निवडणूक कामासाठी हजर न झाल्यास संबंधितांवर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, असे आदेश विभागीय आयुक्त राव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.








