शिवाजीनगर-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दुपारच्या लोकलला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे दाखवणार हिरवा झेंडा

0
slider_4552

दोन लोकल फेऱ्या वाढणार

पुणे :

शिवाजीनगर-लोणावळा दरम्यान रेल्वे विभागाने दोन रेल्वे फेऱ्या वाढवल्या आहेत. दुपारच्या वेळेत लोकल सोडण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने दोन फेऱ्यांची वाढ केली आहे. बुधवारी (दि. 31) रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या लोकलला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

शिवाजीनगर-लोणावळा दरम्यान लोकल, सीएसएमटी ते भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेसला कर्जत येथे थांबा देणे, सीएसएमटी ते चेन्नई या गाडीला लोणावळा येथे थांबा देणे या तीन उपक्रमांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करणार आहेत.

करोना साथ काळात लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्व रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली. दरम्यान, करोना नंतर पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दुपारच्या वेळेतील लोकल बंद करण्यात आल्या होत्या. दुपारच्या वेळेत देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी ब्लॉक घ्यावा लागत असल्याचे कारण रेल्वे विभागाकडून देण्यात आले होते.

दुपारच्या वेळेत लोकल नसल्याने विद्यार्थी, चाकरमानी आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे दुपारच्या वेळेत लोकल सेवा सुरु करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे विभाग आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. संसदेत देखील बारणे यांनी पुणे-लोणावळा लोकल सेवेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मागील काही दिवसांपूर्वी मध्ये रेल्वे विभागाने रेल्वे मंत्रालयाकडे शिवाजीनगर-लोणावळा दरम्यान दोन लोकल फेऱ्या सुरू करण्याबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता केली. यावेळी लोकल सेवा सुरू झाल्याची अफवा देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता रेल्वे विभागाने शिवाजीनगर-लोणावळा दरम्यान दोन फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार पासून या फेऱ्या सुरु होणार आहेत.

शिवाजीनगर स्थानकावरून दुपारी 12.05 वाजता लोकल सुटेल. ही लोकल दुपारी 01.20 वाजता लोणावळा स्थानकावर पोहोचेल. तर लोणावळा स्थानकावरून सकाळी 11.30 वाजता लोकल सुटेल. ही लोकल दुपारी 12.45 वाजता शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

See also  सतत नवव्यांदा पुणे जिल्ह्याने दावे निकाली काढण्यात पटकावला प्रथम क्रमांक..