मुंबई :
मुंबईत हेरिटेज वॉक कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटनाला महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आदी नेत्यांनी हजेरी लावली होती.
गेल्या वर्षी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यात आली होती. 26 जानेवारी २०२० पासून नाईट लाईफच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आल्यानंतर सुरुवातीला अल्पप्रतिसाद मिळाला होता. मात्र, यानंतर राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर सुरु झाल्याने टाळेबंदी लागू करण्यात आली होती.
आता कोरोनाची स्थिती आटोक्यात असून लसीकरण देखील सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नाईट लाईफला चालना मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुढाकार घेतला आहे. ‘मुंबईची नाईट लाईफ वेगळी आहे, आजच्या तरुणांना ही योजना आवडेल. आम्ही त्यास सुरक्षा पुरवू. काही लोक याला विरोध करतील पण मुंबईला नाईट लाईफची गरज आहे.’ असं प्रतिपादन अजित पवार यांनी या कार्यक्रमावेळी केलं आहे.