मुंबई :
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाळ 27 जुलै 2024 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता द्विवार्षिक निवडणूक होत असून यासाठी 12 जुलै 2024 रोजी मतदान होणार आहे.







विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा श्यामसुंदर कायंदे, विजय विठ्ठल गिरकर, अब्दुल्ला खान अ. लतीफ खान दुर्राणी, नीलय मधुकर नाईक, ॲड. अनिल दत्तात्रय परब, रमेश नारायण पाटील, रामराव बालाजीराव पाटील, डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, महादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे 27 जुलै 2024 रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत.
या निवडणुकीसाठी 25 जून 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. 2 जुलै, 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी 3 जुलै 2024 रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 5 जुलै 2024 अशी आहे. 12 जुलै, 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी 5 वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया 16 जुलै, 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.








