पोलीस भरतीवेळी धावताना चक्कर येऊन जमिनीवर कोसळुन २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
slider_4552

पुणे :

राज्यात सुमारे १७,००० हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यातच पोलीस भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीत उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागत असते. याशीच संबंधित पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. येथे मैदानी चाचणीदरम्यान, एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ⁠तुषार बबन भालके (वय २७), असं मृत तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पोलीस भरतीसाठी शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर मैदानी चाचणी सुरू आहे. याचसाठी तुषार बबन भालके हा तरुणही येथे आला होता. यावेळी मैदानी चाचणीदरम्यान धावताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, नवी मुंबईतील पोलीस भरतीदरम्यानही एका तरुणाचा मृत्यू झाला होता. नवी मुंबईतील एसआरपीएफ कॅम्पमध्ये पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू होती. त्यावेळी ही घटना घडली. प्रेम ठाकरे, असे २९ वर्षीय मृताचे नाव असून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याआधी २९ जून रोजी ठाण्यातील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरतीसाठी झालेल्या शारीरिक चाचणीदरम्यान २५ वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला होता. तर इतर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत अक्षय बिराडे यांच्यासह इतर पाच उमेदवारांना चक्कर आणि उलट्या झाल्यामुळे त्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

See also  सगेसोयऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेत नाव घेऊन पाडू; मनोज जरांगेंचा थेट इशारा