शिवसेनेचे नेते राजकारणासाठी तत्वांना तोडत आहेत :  अमित शहा यांची शिवसेनेवर टीका

0
slider_4552

सिंधुदुर्ग:

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेचे नेते राजकारणासाठी तत्वांना तोडत आहेत. ते तत्वासाठी राजकारणात आलेले नसून राजकारणासाठी तत्व तोडणारे आहेत, अशा शब्दात अमित शहा यानी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

अमित शहा यांनी शिवसेनेवर टीका करताना पुढे म्हटले की, तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेशी कोणत्याही प्रकारचे बोलणे झालेले नाही,  यांनी पंतप्रधान मोदी यांची मोठी पोस्टर्स लावून तत्वासाठी मते मागितली. त्यावेळी आम्ही मंचावरून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, ते मुख्यमंत्री बनतील असे सतत सांंगत होतो. त्यावेळी तुम्ही काही का बोलला नाहीत, असा सवाल केला. शिवसेनेने नंतर दगाबाजी केली, अशीही टीका त्यांनी केली.

अमित शहा यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करत सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून या ओटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, असे शहा म्हणत सरकारमधील तिन पक्षांमध्ये समन्वय आणि एकवाक्यता नसल्याचे शहा यांनी सूचिक केले.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांचे तोंड भरून कौतुक करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहणारा नेता म्हणजे नारायण राणे हे असून जेव्हा अन्याय झाला तेव्हा राणेंनी प्रतिकार केला. अन्याय झाल्यानेच त्यांचा प्रवास वळणावळणाने झाला, असे सांगतानाच राणे यांच्यासारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगले माहीत आहे, असे म्हणत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

See also  मुख्यमंत्र्यांचा चिपळूण दौरा, तातडीने मदत जाहिर करणार