गणेशखिंड मॉडर्न महाविद्यालयात ‘करिअर संसद’च्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न

0
slider_4552

पुणे:

गणेशखिंड येथील मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘करिअर संसद’च्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. महाविद्यालयाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा या वेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी घेतली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधींनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सोहळ्याची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर नवनिर्वाचित उपाध्यक्षांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना त्यांच्या पदाची आणि कर्तव्याची शपथ देण्यात आली.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय कुलकर्णी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समर्पण या गुणांचा अंगीकार करून आपले ध्येय साध्य केले पाहिजे.” या वेळी त्यांनी करिअरच्या विविध संधी, नवीन कौशल्यांचे महत्त्व आणि शिक्षण क्षेत्रातील बदलत्या भूमिकेवर विशेष भर दिला.
या कार्यक्रमाला वाणिज्य विभागप्रमुख प्रा. पराग शहा, कला शाखा प्रमुख डॉ. गौरी कोपर्डेकर, तसेच करिअर कट्टा समन्वयक डॉ. ज्योती जोशी व प्रा. मोतीलाल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात आणि उपस्थित शिक्षकांनी नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच करिअर संसदच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख श्रुती बर्गे हिने करून दिली, तर सूत्रसंचालन नमिता गडसिंग हिने केले. शेवटी प्रज्ञा ईथापे हिने उपस्थितांचे आभार मानले.

See also  मिळकत करात ४० टक्के सवलतीचा अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ