पुणे :
महावितरणाने वीज बिले न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई हाती घेताच, बिलाची थकबाकी असलेले ग्राहक खडबडून जागे झाले असून, त्यांनी थकबाकीचा भरणा करण्यास सुरुवात केली आहे. सलग दहा महिन्यांपासून विजबिल न भरलेल्या पुणे परिमंडळातील ७९ हजार ९१६ वीज ग्राहकांनी गेल्या दोन आठवड्यांत ११३ कोटी २२ लाख रुपयांचा बिल भरणा केला आहे.
राज्यातही सलग दहा महिने वीजबिलाची थकबाकी असलेल्या पाच लाख ७४ हजार ४१० लघुदाब ग्राहकांनी ७४९ कोटी रुपये भरणा केला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘महावितरण’ला काहीसा दिलासा मिळाला आहे.
पुणे परिमंडळात दहा महिने वीजबिल न भरलेल्या लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांची एकूण संख्या ३ लाख ९९ हजार १२८ होती. त्यांच्याकडे एकूण ५२६ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक ३ लाख ३१ हजार ८७ असून, त्यांच्याकडील थकबाकी ३२० कोटी ३६ लाख रुपये इतकी होती. या थकबाकीदार ग्राहकांनी ‘महावितरण’च्या आवाहनला प्रतिसाद देऊन थकित बिले भरण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ५५ हजार १७० थकबाकीदारांनी ८१ कोटी ७० लाख रुपये, तर हवेली ग्रामीणसह मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, मावळ व खेड तालुक्यांतील २४ हजार ७४६ थकबाकीदारांनी एक कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा केला आहे, असे ‘महावितरण’तर्फे सांगण्यात आले.
वाढत्या वीजबिल थकबाकीमुळे ‘महावितरण’वरील आर्थिक संकट गडद झाले आहे. त्यामुळे एप्रिल २०२० पासून वीजबिल न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई ‘महावितरण’ने सुरू केली होती. त्या अंतर्गत आठवडाभरात ४९२२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, असेही ‘महावितरण’तर्फे सांगण्यात आले.