बाणेर :
तारीख 09 मार्च, 2021: बाणेर येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या सन 2021 ते 2024 साठीच्या विश्वस्त कार्यकारिणी मंडळाची निवडणूक ट्रस्टच्या परंपरेनुसार यावेळीही बिनविरोध पार पडली. नवीन विश्वस्त मंडळापैकी योगीराज नागरी सहकारी पतसंस्थचे संस्थापक अध्यक्ष व ट्रस्टचे सभासद ज्ञानेश्वर केशवराव तापकीर यांची उपाध्यक्षपदी, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप बबनराव मुरकुटे यांची सचिवपदी, बाणेर गावचे माजी सरपंच व माजी उपाध्यक्ष लक्ष्मण सोपानराव सायकर यांची खजिनदार महणून व विश्वस्त सागर रामदास ताम्हाणे यांची हिशोब तपासनीस पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच शंकरराव मारुती सायकर, गणेश ज्ञानोबा कळमकर, अर्जुन साहेबराव तापकीर, शितल गणेश भुजबळ, वर्षा राजेश विधाते आणि सुनिता विजय धनकुडे आदींची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली. या कार्यकारिणी मंडळा सोबतच बबनराव सादू चाकणकर, भगवंत श्रीपती भुजबळ, राहुल कृष्णाजी पारखे आणि मंगेश पुंडलिक मुरकुटे यांची ट्रस्टच्या सल्लागार समितीमध्ये नेमणूक करण्यात आली.







बाणेर गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथाच्या मंदिराचा जिर्णोद्धार करून लवकरात लवकर भव्य दिव्य असे मंदिर उभारण्याचा व तसेच बाणेर व आसपासच्या परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नती करण्याचे काम हे विश्वस्त मंडळ करणार असल्याचे यावेळी ट्रस्टचे नवनियुक्त उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले.
निवडून आलेले विश्वस्त मंडळ हे अनुभवी व कार्यक्षम असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत वेगवेगळ्या अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या श्री भैरवनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी लावू असा विश्वास नवनियुक्त सचिव डॉ. दिलीप मुरकुटे यांनी व्यक्त केला.
ट्रस्टच्या माध्यमातून पारदर्शक व अधिक चांगल्या पद्धतीने भैरवनाथ उत्सव व इतर कार्यक्रम आयोजित केले जातील असे आश्वासन नवनियुक्त खजिनदार लक्ष्मण सायकर यांनी दिले.
विश्वस्त कार्यकारिणी मंडळामध्ये अनुभवी वरिष्ठ व तरुण पिढीचा योग्य समतोल आहे, त्यामुळे ट्रस्टच्या कामकाजामध्ये सुलभता येईल असेल नवनियुक्त हिशोब तपासनीस सागर ताम्हाणे यांनी सांगितले.
यावेळी जुन्या कार्यकारणी चे आभार मानण्यात आले व तसेच मान्यवरांच्या हस्ते नवीन विश्वस्त मंडळाचा स्वागत सत्कार करण्यात आला.









