सोलापूर :
उजनी जलाशयात मांगुर मासे सापडल्यानंतर आता आणखी एका उपद्रवी, घातक असलेले सकर मासे सापडू लागल्याने मासेमारांची चिंता वाढली आहे. सकर हा मासा मोठ्या प्रमाणात उजनीत सापडू लागल्याने इतर माशांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. तसेच मच्छिमारांच्या जाळ्यांचेही अतोनात नुकसान होऊ लागल्याने मच्छिमारही हैराण झाले आहेत.
सकर माशाचे उगमस्थान तसे अमेरिकेतले आहे. कालांतराने मुबंई खाडीत व वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळून आला होता. तेव्हापासूनच मत्स्य अभ्यासकांनी धोक्याची सूचना दिली होती. मात्र या धोकादायक माशाने आता राज्यातील सर्वांत मोठे असणाऱ्या उजनी पाणलोट क्षेत्र व्यापून टाकले आहे. मुळात तर या माशाची ओळख फिश टॅंकमधील शोभिवंत मासा म्हणून होती. मात्र फिश टॅंकमध्ये अनेक शोभिवंत माशांनी प्रवेश केल्यानंतर व पाळणाऱ्यांची हौस फिटल्यानंतर हा मासा खाडीत व नदी सोडून देण्यास सुरवात झाली.
या माशाची वाढ जलदगतीने तर होतेच शिवाय हा मासा मिश्राहारी असल्याने तो शेवाळ्यांबरोबर इतर माशांना व त्यांची अंडी खाण्यात तरबेज असतो. हा मासा टणक असल्याने इतर माश्यांपासून हा सकर (हेलिकॉप्टर) मासा सुरक्षित राहतो. साहजिकच त्यांच्या संख्येत जलदगतीने वाढ होते. शिवाय पाण्याच्या बाहेर आला की तो जमिनीवर सापाप्रमाणे नागमोडी चालतो. तसेच पाण्याच्या बाहेर चार ते पाच तास जिवंतही राहू शकतो. संपूर्ण अंगाला काटे असल्याने या माशाला ग्राहक मात्र मिळत नाहीत.
असा हा सकर (हेलिकॉप्टर) मासा उजनीत थोड्या संख्येने नव्हे तर मोठ्या संख्येने आढळून येऊ लागला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकल्यानंतर तो सहजासहजी जाळ्यातून निघत नाही. त्यासाठी जाळी फाडावी लागत आहे. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान सध्या होताना दिसत आहे. शिवाय बाजारपेठेत या माशाला मागणी नसते. सध्या शेकडोंच्या संख्येने हा मासा उजनीत सापडू लागल्याने मच्छिमारांच्या चिंतेत भर पडली आहे. मुळात उजनीचे वाढते प्रदूषण, बेकायदेशीर व व्यावसायिक मासेमारी यामुळे उजनीतील मासेमारी धोक्यात सापडली असताना, आता या सकर माशाची भर पडली आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने वेळीच धोका ओळखून सकर मासे नष्ट करण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकल्यानंतर तो सहजासहजी जाळ्यातून निघत नाही त्यासाठी जाळी फाडवी लागत आहेत. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान सध्या होताना दिसत आहे. उजनीचे वाढते प्रदूषण, बेकायदेशीर व व्यावसायिक मासेमारी यामुळे उजनीतील मासेमारी धोक्यात सापडली असताना आता मोठ्या प्रमाणात सापडू लागलेल्या या धोकादायक सकर माशांमुळे अडचणी वाढल्या आहेत.